जिल्ह्यातील ३० हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:28 AM2021-03-18T04:28:58+5:302021-03-18T04:28:58+5:30

गोंदिया : मागील वर्षी राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची ...

When will 30,000 farmers in the district get incentive grant? | जिल्ह्यातील ३० हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार?

जिल्ह्यातील ३० हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार?

googlenewsNext

गोंदिया : मागील वर्षी राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. त्यानंतर राज्य शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान देण्याचा सूर आवळला आहे. यासाठी जिल्ह्यातील ३० हजार २३० शेतकरी पात्र ठरणार आहेत. शासनाने घोषणा करून वर्षभराचा कालावधी लोटला तरी प्रत्यक्षात प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही जमा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासन प्रोत्साहन अनुदान केव्हा मिळणार, असा सवाल करीत आहेत. एवढेच नव्हे, तर प्रोत्साहनपर अनुदान आपल्या बँक खात्यावर जमा झाले का याची विचारपूस करण्यासाठी बरेच शेतकरी बँकांच्या पायऱ्या झिजवीत आहेत. मात्र, त्यांना गेल्या पावलीच निराश होऊन परत जावे लागत आहे. प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केव्हा जमा होणार याची माहिती संबंधित विभाग आणि बँकांनासुद्धा नसल्याची बाब पुढे आली.

............

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

मी जिल्हा बँकेत ७५ हजार रुपयांच्या पीक कर्जाची उचल केली होती. त्याची मुदतीत परतफेडसुद्धा केली. मागील दोन-तीन वर्षांपासून मी नियमित पीक कर्जाची परतफेड करीत आहे; पण शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ अद्यापही मला मिळाला नाही.

- रामदास नागपुरे, शेतकरी

............

दरवर्षी खरीप हंगामाकरिता मी जिल्हा बँकेतून पीक कर्जाची उचल करतो. त्याची नियमित परतफेड करतो. मागील राज्य सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले होते; पण अनुदानाची रक्कम अजूनही बँक खात्यात जमा झाली नाही.

- दिलीपसिंह गहरवार, शेतकरी

.....................

४२ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

राज्य सरकारने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. यासाठी जिल्ह्यातील ५२ हजारांवर शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी ४२ हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे.

...........

कोट

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती; पण यासंदर्भातील कुठल्याही सूचना बँक अथवा सहकार विभागाला प्राप्त झालेल्या नाहीत.

- बँक व्यवस्थापक.

...........

घोषणा झाली, मात्र अद्यापही जीआर नाही

राज्य शासनाने मागील वर्षी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, वर्षभराचा कालावधी लोटूनही यासंदर्भातील जीआर निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे.

.............

कर्ज वेळेवर फेडणारे शेतकरी

३०२३०

प्रोत्साहन अनुदान मिळालेले शेतकरी

००

Web Title: When will 30,000 farmers in the district get incentive grant?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.