जीर्ण झालेल्या पुलाची दखल केव्हा घेणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 06:00 AM2019-09-05T06:00:00+5:302019-09-05T06:00:30+5:30
या पुुलावर कठडे नसल्याने यावरुन ये-जा करताना जीवाला धोका असतो.२० वर्षापूर्वीच तयार केलेल्या या पुुलाचे दोन वेळा लोखंडी कठडे वाहून किंवा काही चोरी गेले.हा पूल सुद्धा अनेक ठिकाणातून जीर्ण झाला आहे. त्यामुळे यावरुन ये-जा करणाऱ्या लोकांसाठी हा पूल यमदूत ठरत आहे.
विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : गडमाता मंदिर पहाडाच्या पायथ्याशी कुआढास नदीवरील पुलाची उंची फारच कमी असल्याने पावसाळ्यात केव्हाही पुलावरुन पाणी वाहते असते. पुलाला कसल्याही प्रकारचे कठडे लावले नसल्याने या पुलाने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहे.या पुलापासून काही अंतरावर बंधारा असून त्या बंधाऱ्यावरुन वेगाने पाणी वाहत येते. अशात हा जीर्ण झालेला पूल केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र संबंधित विभागाने याची अद्यापही दखल घेतलेली नाही. त्यामुळे हा पूल तयार करण्याची सद्बुध्दी प्रशासनाला केव्हा येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सालेकसा-नानव्हा मार्गावर असलेल्या या पुलावरुन जाताना वर्षभर जीवाला धोका असतो.एकतर या पुलाची उंची कमी असून पूल अरुंद असल्याने दोन्ही दिशेने येणारे कोणतेही वाहन किंवा बैलगाड्या एकाच वेळी पुढे जाऊ शकत नाही. अशात एकमेकाला जाण्यासाठी रस्ता सोडताना सरळ नदीत कोसळून पडण्याची भिती असते. तसेच कठडे लावले नसल्याने या पुलावरुन ये-जा करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. एवढेच नव्हे तर पुलाची उंची कमी असल्याने पुलाकडे जातांना उतार भागाला तोंड द्यावे लागते. अशात वाहनावर नियंत्रण ठेऊन काळजीपूर्वक जावे लागते.एखादे चारचाकी वाहन आल्यास विरुद्ध दिशेने वाहन किंवा बैलगाडी आली की अपघाताची शंभर टक्के शक्यता असते.
सालेकसा मुख्यालयी आपल्या कामानिमित्त जाण्यासाठी नानव्हा, घोन्सी, गरुटोला, बिंझली, खोलगड, भरसूला, ढिमरटोला येथील लोकांना नेहमी या पुलावरुन ये-जा करावी लागते.शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दररोज शेकडो विद्यार्थी या पुलावरुन ये-जा करतात.परंतु प्रत्येकाला आपला जीव मुठीत घेऊन हा पूल पार करावा लागतो. ५ वर्षापूर्वी पंचायत समितीचे माजी सभापती बाबुलाल उपराडे यांच्या पुतण्याची मोटारसायकल पूल ओलांडतांना पुलाच्या खाली गेली व तो पुरात वाहून गेला. सन २०१० मध्ये म्हसगाव येथील देवेंद्र बोपचे नावाचा इसम सायकलवरील ताबा सुटून पुलाखाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. तर नानव्हा येथील केवललाल बिसेन बैलगाडीने जात असताना त्याच्या ही ताबा सुटल्याने बैलगाडीसह पुलाखाली पडला त्याचा कसाबसा जीव वाचला. परंतु बैलांचा जीव गेला. एकदा रोडरोलर या पुलावरुन चढतांना मागे घसरला व नदीत जाऊन पडला होता.
या पुुलावर कठडे नसल्याने यावरुन ये-जा करताना जीवाला धोका असतो.२० वर्षापूर्वीच तयार केलेल्या या पुुलाचे दोन वेळा लोखंडी कठडे वाहून किंवा काही चोरी गेले.हा पूल सुद्धा अनेक ठिकाणातून जीर्ण झाला आहे. त्यामुळे यावरुन ये-जा करणाऱ्या लोकांसाठी हा पूल यमदूत ठरत आहे.
नवीन उंच पूल तयार करा
या पुलामुळे कित्येकांचा जीव गेला असल्यामुळे नवीन उंच पूल तयार करण्यात यावा म्हणून परिसरातील नागरिकांनी अनेकदा लोकप्रतिनिधींसह शासनाकडे मागणी केली. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यानंतर शासनाचे लक्ष या पुलाकडे जाईल असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला.