शेतकऱ्यांना बारदाना परताव्याची रक्कम केव्हा मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:30 AM2021-04-02T04:30:14+5:302021-04-02T04:30:14+5:30
केशोरी : गेल्या वर्षी खरीप हंगामातील आणि रब्बी हंगामातील आदिवासी महामंडळाने आधारभूत धान खरेदी केंद्रामध्ये धान्य खरेदी करताना शेतकऱ्यांजवळील ...
केशोरी : गेल्या वर्षी खरीप हंगामातील आणि रब्बी हंगामातील आदिवासी महामंडळाने आधारभूत धान खरेदी केंद्रामध्ये धान्य खरेदी करताना शेतकऱ्यांजवळील बारदाना वापरला होता. धानाच्या चुकाऱ्यासोबत बारदाना रकमेचा परतावा करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु अजूनही शेतकऱ्यांना बारदाना परताव्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बारदाना परतावा रक्कम केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.
बारदाना रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यास आदिवासी विकास महामंडळ टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मागील वर्षीच्या खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील धान विक्री करताना शेतकऱ्यांनी स्वत: जवळील २५ रुपये प्रती किमतीचा बारदाना वापरुन महामंडळाच्या आधारभूत धान खरेदी केंद्राला दिला. शासनाकडे बारदाना उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना विनंती करुन त्याचा बारदाना वापरण्यात आला. त्या वर्षीच धानाची चुकारे मिळाले परंतु बारदाना परतावा रक्कम अजूनही शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आली नाही. धान चुकारे जेव्हा मिळतील तेव्हाच बारदाना रक्कम देण्यात येईल असे महामंडळाकडून शेतकऱ्यांना सांगितले होते. परंतु एक वर्षाचा कालावधी लोटूनही आदिवासी महामंडळाने बारदाना रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. यासंदर्भात अनेकदा दिनेश पाटील रहांगडाले यांनी आदिवासी उपप्रादेशिक कार्यालय यांचेशी संपर्क साधून विचारणा केली असता यापूर्वी अधिकारी दुसरे होते त्यामुळे त्यांनी काय केले आहे हे मला माहीत नाही. माहिती घेतल्यानंतर बारदाना परतावा रक्कम देण्याची कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
......
अधिकारी म्हणतात रेकार्ड सापडेना
संबंधित अधिकाऱ्यांना बारदाना देय रकमेचा रेकार्ड सापडत नाही याचे नवल वाटते. या संबंधीची माहिती प्रत्येक आधारभूत धान खरेदी केंद्रावर उपलब्ध असताना माहिती घेण्यासाठी पंधरा पंधरा दिवस लावणे याचा अर्थ शेतकऱ्याप्रति संबंधित अधिकाऱ्यांना किती सहानुभूती आहे हे दिसून येते. याकडे शासनाने त्वरित लक्ष घालून शेतकऱ्यांना बारदाना परताव्याची रक्कम अदा करावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.