त्यांच्या झोपडीत दिवा लागणार केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 10:05 PM2019-07-08T22:05:35+5:302019-07-08T22:05:48+5:30
शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले कुडवा हे गाव. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला वसलेली मांग गारूडी समाजाची वस्ती. या वस्तीतील मांग गारूडी समाजाच्या लोकांना मुुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर या मागील आठ-दहा वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले कुडवा हे गाव. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला वसलेली मांग गारूडी समाजाची वस्ती. या वस्तीतील मांग गारूडी समाजाच्या लोकांना मुुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर या मागील आठ-दहा वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. वस्तीतील मुले चांगल शिक्षण घेवून या प्रवाहातून बाहेर यावी, त्यांना वसतिगृहात आणि चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी सुध्दा त्या आणि त्यांचे पती धनेंद्र भुरले हे प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्या वस्तीमध्ये अद्यापही वीज पोहचली नसून अंधाराचे साम्राज्य कायम आहे. त्यामुळे झोपडीत दिवा त्यांच्या लागणार केव्हा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मांग गारूडी समाजातील वस्तीतील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी एनएनबीवायच्या मदतीने संध्याकाळी विद्यार्थ्यांना शिकविले जाते. त्यामुळे या वस्तीतील मुलांना अक्षर ओळख होवू लागली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या वस्तीतील नागरिकांना त्यांचे अधिकारी मिळावे यासाठी सविता बेदरकर यांचा खटोटोप सुरु आहे.
राजकारण्यापासून ते समाजकारण्यापर्यंत प्रत्येकांना या वस्तीत नेऊन त्यांच्या समस्यांची जाणीव करुन दिली. त्यांच्या लढ्याला थोड्याफार प्रमाणात यश आले. त्यांना आता हक्काची जागा मिळाली. मात्र त्यांच्या इतर समस्या कायम आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून अतिक्रमण करून वसवलेली ही वस्ती आता अण्णाभाऊ साठेनगर या नावाने ओळखली जाऊ लागली आहे.
इंडसच्या मदतीने वस्तीत शाळा सुरू करण्यात आली होती. मात्र ती सुद्धा बंद पडली आहे. पूर्वी मालिश करणे, दायीचे काम करणे असा पूर्वापार व्यवसाय हा समाज करायचा. मांग गारूडी समाजाच्या वस्तीत भीक मागून, कबाडी वेचून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गलीच्छ राहतात म्हणून त्यांना कोणी काम द्यायला तयार नाही.काम मिळत नाही म्हणून त्यांचे गलिच्छ राहणं सुधारत नाही. अशा दृष्टचक्रात हा समाज गुरफटलेला आहे. आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत त्यांच राहणीमान सुधारणार नाही.
रोजगाराची समस्या
या वस्तीतील नागरिकांचा सर्वात मोठा प्रश्न हा रोजगाराचा आहे. त्यामुळे किमान आम्हाला सफाई कामगार म्हणून तरी नोकरी द्या अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. वंचितांच्या आयुष्यात कधी उजेड येईल का? इथं नेतागिरी करण्यासाठी खूप जण येतात. पण त्यांच्या मूलभूत गरजा आणि रोजगाराच्या संधी देण्यासाठी काय करता येईल असा ठोस कार्यक्रम इथे कुणीच राबवत नाही.त्यांच्या राहणीमानावर टीका होते. पण त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी काय करता येईल का यावर कुणीच मंथन करीत नाही.
पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती
येथील मांग गाऊडी वस्तीत अद्यापही विविध सोयी सुविधांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने येथील महिलांना वस्तीपासून तीन दोन कि.मी.अंतरावर पाणी आणण्यासाठी जावे लागते. निवडणुका आल्या की मतांचा जोगवा मागण्यासाठी येणारे राजकारणी सुध्दा निवडणुकीनंतर या वस्तीकडे ढूंकूनही पाहत नाही.
विजेची प्रतीक्षाच
या वस्तीमध्ये अद्यापही विजेची व्यवस्था नाही.विशेष म्हणजे या वस्तीच्या बाजुलाच एक अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. मात्र या वस्तीकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेले नाही. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी सुध्दा याकडे भटकले नाही.
शौचालयाचे केवळ खड्डेच
या वस्तीमध्ये स्वच्छ भारत योजनेतंर्गत शौचालयासाठी खड्डे तयार करण्यात आले. पण त्यानंतर या विभागाचे अधिकारी या वस्तीकडे भटकलेच नाही. त्यामुळे वस्तीतील नागरिकांना अजुनही उघड्यावरच शौचास जावे लागत आहे.