सडक अर्जुनीतील प्रमुख समस्या केव्हा सुटणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:26 AM2021-01-18T04:26:59+5:302021-01-18T04:26:59+5:30
राजेश मुनिश्र्वर सडक अर्जुनी : मागील पाच वर्षांपासून जनतेच्या समस्या पूर्ण न झाल्याने शहरवासीय बेजार झाले आहेत. प्रत्येक वॉर्डातील ...
राजेश मुनिश्र्वर
सडक अर्जुनी : मागील पाच वर्षांपासून जनतेच्या समस्या पूर्ण न झाल्याने शहरवासीय बेजार झाले आहेत. प्रत्येक वॉर्डातील समस्या आता डोके वर काढत आहेत. शहरातील नाल्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. सांडपाण्याची अद्यापही योग्य व्यवस्था नसल्याने रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या सर्व समस्यांकडे लोकप्रतिनिधी आणि नगर पंचायतचे दुर्लक्ष झाले आहे.
शहरातील काही नवीन वॉर्डांत रस्त्याची समस्या कायम आहेत. रस्ता झाला तर नाल्या नाहीत. रस्ता उंच, नाल्या खाली झाल्याने नाल्यातील घाण पाणी बाहेर निघत नाही. सडक अर्जुनी शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी मोठे वॉटर फिल्टर प्लांट लावण्याची गरज आहे. सतराही वॉर्डातील काही ठिकाणी वॉटर फिल्टर लावण्यात मात्र नगर पंचायत मागे राहिली, तर काही ठिकाणचे यंत्र बंद पडले आहेत. शहरात नागरिकांना चौकाच्या ठिकाणी बसण्यासाठी सिमेंट खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. त्यांचीसुद्धा आता दुरवस्था झाली आहे. बसस्थानक नसल्यामुळे कुठेतरी झाडाखाली थांबून ताटकळत प्रवाशी बसची वाट बघताना दिसतात. या समस्यांकडे अद्यापही कुणाचेही लक्ष गेलेले नाही. काही नवीन लेआउटच्या जागेतील ओपन स्पेसची जागा बिनधास्त विकल्याच्या तक्रारी आत्ता तहसील कार्यालयात येत आहे. ह्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. काही ठिकाणी रस्ते चोरीला गेल्याने ले- आउटमधील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी फेऱ्याने जाऊन त्रास सहन करावा लागत आहे. आठवडी बाजार गावाचे बाहेर ठेवण्याची गरज आहे. मात्र रस्त्यावर बाजार भरत असल्याने विविध समस्या निर्माण होत आहे.
.....
शहरातील नाल्या दुरुस्तीचे काम मंजूर झाले आहे. ते काम काही दिवसात सुरू होतील. ज्या नाल्या घाणीने भरल्या आहेत त्यांना साफ करण्याचे काम लवकरच सुरू केले जाईल.
मिहाल नायकवडी
कर प्रशासक अधिकारी
नगर पंचायत सडक अर्जुनी