गणिताची पुस्तके केव्हा मिळणार?
By admin | Published: August 19, 2014 11:48 PM2014-08-19T23:48:00+5:302014-08-19T23:48:00+5:30
संपूर्ण जिल्ह्यात शाळा सुरू होवून जवळ-जवळ दोन महिने पूर्ण होत आहेत. पण बहुतेक शाळांमध्ये विविध विषयांचे पुस्तकेच उपलब्ध न झाल्याची बाब आता पुढे आली आहे.
सडक/अर्जुनी : संपूर्ण जिल्ह्यात शाळा सुरू होवून जवळ-जवळ दोन महिने पूर्ण होत आहेत. पण बहुतेक शाळांमध्ये विविध विषयांचे पुस्तकेच उपलब्ध न झाल्याची बाब आता पुढे आली आहे.
सदर प्रतिनिधीने तालुक्यातील मनेरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. या शाळेत वर्ग चौथीमध्ये नऊ विद्यार्थी आहेत. पण गणित या विषयाचे नऊ विद्यार्थ्यांसाठी केवळ दोनच पुस्तके मिळाल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली आहे. याच केंद्रातील बावनकुळे यांच्या भेटीत कनेरी/राम या गावातील शाळेत गणित विषयाची माहिती जाणून घेतली असता वर्ग चौथीमध्ये १४ विद्यार्थी असून कनेरी शाळेला जि.प.कडून फक्त दोन पुस्तके मिळाल्याची माहिती दिली. ही गंभीर समस्या लक्षात घेवून सदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी दुसऱ्या शाळेतून पुस्तके मागवून मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही. पण जिल्हा परिषदेच्या शाळांतील या मुलांचा शैक्षणिक खेळखंडोबा झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांचे पालकही त्रासले आहेत. तालुक्यातील काही केंद्रात मराठी माध्यमांच्या शाळांना इंग्रजी विषयाच्या पुस्तका देऊन आता मोकळे झाल्याचे दिसत आहे. विविध विषयांच्या पुस्तकांचा तुटवड्याची तालुक्यातील इतर केंद्रातही हिच परिस्थिती असल्याचे एका शिक्षकाने सांगितले आहे.
दोन महिने होऊनही त्या मुलांना पुस्तके मिळाली नाही तर पुढे पुस्तके केव्हा मिळातील? हा संशोधनाचा विषय ठरत आहे. विषयांची पुस्तके न मिळाल्याने त्या विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, हा प्रश्न निर्माण होत आहे. पुस्तकांच्या तुटवड्याचा हा गंभीर प्रश्न पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी उपस्थित करून गोर-गरीब जनतेच्या मुलांना वेळेवर पुस्तका देण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे. पण कोणताही नेता या समस्येकडे लक्ष देत नसल्याची माहिती पुढे येत आहे.
केंद्रप्रमुख बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या समस्येची माहिती जि.प. गोंदियाला लेखी स्वरूपात दिली आहे. पण अजूनपर्यंत पुस्तका न पाठविल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. (शहर प्रतिनिधी)