रेल्वेचे मासिक पास कधी सुरू होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:34 AM2021-09-24T04:34:34+5:302021-09-24T04:34:34+5:30
गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षापासून रेल्वे विभागाने मंथली सिझन पास (एमएसटी) बंद केले आहे. ते अद्यापही सुरू ...
गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षापासून रेल्वे विभागाने मंथली सिझन पास (एमएसटी) बंद केले आहे. ते अद्यापही सुरू केले नाही. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या आणि अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावरून दररोज गोंदिया ते नागपूर, नागपूर ते गोंदिया, गोंदिया ते चंद्रपूर, गोंदिया ते बालाघाट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाच ते सहा हजार आहे. यात नोकरी आणि रोजगारासाठी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रेल्वेची वाहतूक सुरळीत होत असताना रेल्वेने मासिक पास अद्यापही सुरू केलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना दररोज चारशे ते पाचशे रुपयांचा अधिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मासिक पास केव्हा सुरू करणार यावर रेल्वेने अजूनही मौनच बाळगले आहे.
............
मुंबईत शक्य मग येथे का नाही?
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबईत रेल्वेचे मासिक पास दिले जात आहेत. मग हाच नियम येथे लागू करून अपडाऊन आणि नियमित प्रवास करणाऱ्यांना मासिक पास देण्याची नेमकी अडचण काय असा सवाल जिल्ह्यातील प्रवाशांनी केला आहे. रेल्वे विभागाचे एकाच गोष्टीसाठी वेगवेगळे निकष का असा सवाल उपस्थित केला जात आहे. रेल्वेने त्वरित मासिक पासची सुविधा सुरू करावी. आता रेल्वे गाड्यांची संख्यासुद्धा वाढली आहे.
...........
सध्या सुरू असलेल्या रेल्वे गाड्या
गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस
गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस
जबलपूर-चांदाफोर्ट
हावडा-मुंबई
हावडा-पुणे
आझाद हिंद एक्सप्रेस
अजमेर-पुरी एक्सप्रेस
समता एक्सप्रेस
अमृतसर-छत्तीसगड एक्सप्रेस
.............................
रेल्वे बोर्डाच्या आदेशाची प्रतीक्षा
कोरोनाच्या संसर्गामुळे रेल्वेने मागील दीड वर्षापासून मासिक पास बंद केले आहेत. मासिक पास सुविधा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून अद्याप कुठलेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे ही सेवा केव्हा सुरू होणार हे आताच सांगता येणार नाही.
- जनसंपर्क अधिकारी, रेल्वे
...................
भुर्दंड किती दिवस सहन करायचा?
कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात आला असून सर्व व्यवहारदेखील सुरळीत झाले आहेत. तर रेल्वे विभागानेही गाड्यांची संख्या वाढविली आहे. मग रेल्वेला मासिक पासची सेवा सुरू करण्यास नेमकी अडचण काय हे समजण्यास मार्ग नाही. यामुळे आमच्यासारख्या नियमित प्रवास करणाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
- नीरज गुप्ता, प्रवासी
.......
माझे कुरियरचे काम आहे. त्यामुळे मला दररोज गोंदिया ते नागपूर हा प्रवास करावा लागतो. मात्र, मासिक पास बंद असल्याने मला दररोज चारशे रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. रेल्वेकडे मासिक पासची सेवा त्वरित सुरू करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली पण त्यांनी अद्यापही दखल घेतली नाही.
- सचिन उबाळे, प्रवासी
.......
मासिक पासमुळे अपडाऊन करण्याचा आर्थिक भुर्दंड बसत नव्हता. मात्र, मागील दीड वर्षापासून ही सुविधा बंद असल्याने अपडाऊन करणेसुध्दा अवघड झाले आहे. रेल्वेने विशेष गाड्यांच्या नावावर प्रवाशांची लूट चालविली आहे. तशीच लूट मासिक बंद करून सुरु ठेवली आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
- दिनेश चचाणे, प्रवासी