जिल्ह्यातील जि.प. शाळांत २१ टक्के शिक्षकांची रिक्त पदे केव्हा भरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 15:51 IST2025-03-26T15:49:59+5:302025-03-26T15:51:01+5:30

७८३ शिक्षक-मुख्याध्यापक नाहीत : विद्यार्थ्यांना कोण शिकविणार?

When will the 21 percent vacant posts of teachers in the district's Z.P. schools be filled? | जिल्ह्यातील जि.प. शाळांत २१ टक्के शिक्षकांची रिक्त पदे केव्हा भरणार?

When will the 21 percent vacant posts of teachers in the district's Z.P. schools be filled?

नरेश रहिले 
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या असूनही विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक नाहीत. परिणामी पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक व ग्रामस्थ शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांसह गटशिक्षणाधिकाऱ्यांना साकडे घालत आहेत. रिक्त पदाने शिक्षण विभागाचा ताण वाढविला आहे. कंत्राटी शिक्षक भरती करून ओरड कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याने या विद्यार्थ्यांना शिकविणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गोंदिया जिल्ह्यात २१.१० टक्के शिक्षकांची पदे रिक्त आहेत.


अनेक शाळांमध्ये सुविधांचाही अभाव
जिल्हा परिषद शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्या पाडून त्या ठिकाणी नवीन बांधकाम करणे आवश्यक आहे. मात्र, निधीची अडचण पुढे करून केवळ डागडुजी करण्यात येत आहे. या धोकादायक इमारतीत बसून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. याशिवाय सुरक्षा भिंत, वीज, शौचालय, रॅम्प आदी सुविधांचाही अभाव आहे.


पदवीधरांची १९० तर सहाय्यक शिक्षकांची ५५० पदे रिक्त
गोंदिया जिल्ह्यातील पदवीधर शिक्षकांची ९३३ पदे मंजूर असताना त्यातील ७४३ जागा भरल्या आहेत. तर १९० जागा रिक्त आहेत. सहाय्यक शिक्षकांची २६१४ पदे मंजूर असताना त्यातील २ हजार ६४ जागा भरल्या आहेत. तर ५५० जागा रिक्त आहेत.


जिल्ह्यात ७८३ शिक्षकांची पदे रिक्त
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जवळपास ७८३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातही शिक्षक सेवानिवृत्त होत असल्याने हा आकडा फुगत चालला आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याची ओरड यापूर्वी ऐकायला मिळाली. मात्र, बहुतांश शाळांमध्ये पटसंख्या असूनही शिक्षक मिळत नाहीत.


कंत्राटी शिक्षकांची भरती
नुकसान होऊ नये, दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी खासगी शाळांमध्ये टाकण्याकडे कल वाढला चालला आहे, तर जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक मिळत नसल्याने पटसंख्या टिकणार आणि वाढणार कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत आता कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात आली आहे.


या तालुक्यांत शिक्षक जायला तयार नाहीत
गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी सालेकसा, देवरी, अर्जुनी-मोरगाव या तीन तालुक्यांच्या नक्षलग्रस्त भागात शिक्षक जायला तयार नाहीत.


४३ पदे मुख्याध्यापकांची रिक्त
उतरत्या वयात मुख्याध्यापकाचे पद स्वीकारण्याकडे अनेकजण कानाडोळा करीत असतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच मुख्याध्यापकांची ४३ पदे रिक्त असल्याने उपमुख्याध्यापकांवरच अनेक जि. प. शाळांचा कारभार सुरू असल्याचे दिसून येते. खासगी शाळांमध्येही मुख्याध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत.


 

Web Title: When will the 21 percent vacant posts of teachers in the district's Z.P. schools be filled?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.