गोंदिया मार्गावरील पथदिवे केव्हा उजळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 04:59 PM2024-05-22T16:59:01+5:302024-05-22T16:59:25+5:30
दोन वर्षे लोटूनही उपाययोजना नाही: केवळ खांब उभारून ठेवले
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : आमगाव-देवरी व आमगाव- गोंदिया या महामार्गाचे नूतनीकरणाचे काम बहुतांश पूर्ण झालेले आहे. कंत्राटदार कंपनीने या महामार्गावर मधात पथदिव्यांची व्यवस्था केली आहे. परंतु हे पथदिवे शोभेची वस्तू ठरत आहे. त्यामुळे रात्री या पथदिव्याखाली अंधारच असतो. त्यामुळे वाहन चालकांना सुद्धा याचा फटका बसत आहे.
सन २०१७ पासून आमगाव देवरी व आमगाव गोंदिया महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. देवरी ते गोंदिया मार्गाचे बहुतांश काम पूर्ण झालेले आहे. शहरालगत असलेले रेल्वे चौकीवरील उड्डाणपुलाअभावी काही काम अपूर्ण आहे. त्यामुळे या रस्त्यावर रात्रीला अंधारात असतो. कंत्राटदार कंपनीने मागील दोन वर्षांपूर्वीच या महामार्गावर कोट्यवधी रुपये खर्च करून पथदिव्यांची व्यवस्था केली आहे. परंतु कंपनीने ही व्यवस्था नगरपरिषद प्रशासनाला हस्तांतरित केली नसल्यामुळे दोन वर्षे लोटूनही पथदिवे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या पथ दिव्याखाली खाली उजेड केव्हा पडणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिक आमगाव शहरात खरेदीसाठी ये-जा करतात.
तसेच अनेक नागरिक कामावरून परततात पण पथदिवे बंद असल्याने सायकलने व दुचाकीने प्रवास करणाऱ्यांना याचा फटका बसत आहे. अंधारामुळे या ठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.
पथदिव्यांचे वीज बिल कोण भरणार
कंत्राटदार कंपनीने पथदिवे तर उभारले परंतु डिमांड भरून मीटरची व्यवस्था केली नाही. तसेच टेस्ट करून आम्हाला हस्तांतरित केले नाही. त्यानंतर वीज बिलाच्या आर्थिक बोजा नगरपरिषदेला सहन करावा लागणार आहे. नगर परिषद आधीच आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे पथदिव्यांचा खर्च कुठून करणार असे नगर परिषदेचे अधिकारी सांगतात.
शासनाकडून मिळणारा निधी जातो कुठे
आमगाव ग्रामपंचायत नंतर आमगाव नगर परिषदमध्ये रुपांतरीत झाल्यापासून शासनाकडून मिळणाऱ्या निधीत वाढ पण झाली आहे. मात्र हा निधी जाते कुठे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे नगर परिषदचे काम आहे व सुविधा मिळणे गरजेचे आहे. पण याकडे नगर परिषद पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.
कामावरून परतताना रात्री उशिरापर्यंत घरी या मार्गावरून जाताना अंधार असल्यामुळे व किडंगीपार नाल्याजवळ असलेले मोठमोठे खड्डे अंधारात दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी अनेकदा अपघात झाले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पथदिवे सुरू करावे अशी मागणी आहे.
- रमेश चुटे, नागरिक किडंगीपार