पाणीपुरवठा योजनेतून केव्हा होणार पाणीपुरवठा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:26 AM2021-01-22T04:26:35+5:302021-01-22T04:26:35+5:30
राजेश मुनिश्वर सडक अर्जुनी : तालुक्यातील १७ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी पुतळी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली ...
राजेश मुनिश्वर
सडक अर्जुनी : तालुक्यातील १७ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी पुतळी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली हाेती. पण, नियोजनाअभावी या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. या योजनेकडे अद्यापही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष गेले नाही. त्यामुळे कोेट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या पाणीपुरवठा योजनेतून शुद्ध पाण्याचा पुरवठा केव्हा सुरळीत होणार, असा सवाल गावकरी करीत आहेत.
पाणीपुरवठा योजनेच्या पंप हाउसकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या काही महिन्यांपूर्वी खडीकरणाचे काम करण्यात आले होते. पण तेसुद्धा अल्पावधीत उखडले आहे. सडक अर्जुनी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ ३५ वर्षांपूर्वी एका पाणी टाकीचे बांधकाम करण्यात आले होते. पण, ती टाकीसुद्धा आता पूर्णपणे जीर्ण झाली आहे. या पाणी टाकीची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. जीर्ण टाकीतूनच शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे यातून मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
.......
चार काॅलनीतील नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित
कोदामेडी परिसरातील नाल्याजवळ असलेल्या विहिरीतून सडक अर्जुनी शहरातील नागरिकांना नळ योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तर कस्तुरीदेवी नगर, प्रगती कॉलनी, लहरी नगर, शिक्षक कॉलनी, गोयल नगरमध्ये नळ योजनेचे जाळे नसल्याने शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.
......
वॉटर फिल्टरची गरज
सडक अर्जुनी शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी मोठे वॉटर फिल्टर प्लांट लावण्याची गरज आहे. वॉटर फिल्टर नसल्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नगर पंचायतने वॉटर फिल्टर लावण्याची मागणी शहरवासीयांनी केला आहे.
.....
वृक्षारोपण केलेली झाडे वाळली
शहरातील प्रत्येकच वॉर्डात ३३ कोटी वृक्ष लागवडी योजनेंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले होते. पण वृक्षारोपण केल्यानंतर त्यांच्या देखभालीकडे नगर पंचायतचे दुर्लक्ष झाल्याने वृक्षारोपण केलेली सर्व झाडे वाळली आहेत.
....
सडक अर्जुनी शहरातील पंप हाउसकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. पण, हा रस्ता पुन्हा उखडला असल्याने या रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करण्यात आली नाही.
- राजीव जाधव, कनिष्ट अभियंता, नगर पंचायत
...
शहरातील समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्य, पिण्याचे शुद्ध पाणी या मूलभूत सुविधा नागरिकांना मिळणे आवश्यक आहे.
- रेखा मुनिश्वर, नागरिक.