गणवेशाची रक्कम अडली कुठे?
By admin | Published: July 6, 2016 02:04 AM2016-07-06T02:04:09+5:302016-07-06T02:04:09+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालकांना प्रत्येकी दोन गणवेश देण्याचे शासनाने ठरविले.
मुख्याध्यापकांच्या खात्यात निधीच नाही : पहिल्या दिवसापासून गणवेशाचा दावा फोल
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालकांना प्रत्येकी दोन गणवेश देण्याचे शासनाने ठरविले. त्यासाठी जिल्ह्यातील ७३ हजार ८६० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्यासाठी २ कोटी ९५ लाख ४४ हजार रूपये मुख्याध्यापकांच्या खात्यात वळते केल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येते. मात्र अनेक मुख्याध्यापकांच्या खात्यात पैसे न आल्याने अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश मिळालेले नाही. तर काही ठिकाणी दोनऐवजी एकच गणवेश वाटप करण्यात आला.
दरवर्षी अर्धे सत्र उलटूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नव्हते. परंतु यावर्षी पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना गणवेशात येण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दिले होते.
त्यानुसार शाळा सुरू होण्याच्या १५ दिवसांपूर्वीच मुख्याध्यापकांच्या खात्यात पैसे वळते करण्यात आल्याचे माहिती सर्वशिक्षा अभियानातर्फे देण्यात आली होती. परंतु शालेय सत्र सुरू होऊन आठवडा लोटला तरी शिक्षण विभागाने पाठविलेले पैसे अनेक मुख्याध्यापकांच्या खात्यात पोहोचलेच नाही.
त्यामुळे पुर्ण विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले नाही. काही ठिकाणी एकच गणवेश वाटप करण्यात आल्याची माहिती आहे.
वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यासाठी शासनाने दोन कोटी ९५ लाख ४४ हजार रूपये गोंदिया जिल्ह्याला दिले आहेत.
एका गणवेशापोटी २०० रूपये तर दोन गणवेशासाठी ४०० रूपये एका विद्यार्थ्यामागे संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यात टाकण्यात आले.
हे गणवेश अनुसूचित जाती, जमाती, दारिद्र्य रेषेखालील मुले व सर्व मुलींना दिले जातात. (तालुका प्रतिनिधी)
शासनाने पैसे खात्यात पोहोचण्यास विलंब
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ८०९६ विद्यार्थ्यांसाठी ३२ लाख ३८ हजार ४०० रूपये, आमगाव तालुक्यातील ७७०३ विद्यार्थ्यांसाठी ३० लाख ८१ हजार २०० रूपये, देवरी तालुक्यातील ६०८७ विद्यार्थ्यांसाठी २४ लाख ३४ हजार ८०० रूपये, गोंदिया तालुक्यातील २०४५८ विद्यार्थ्यांसाठी ८१ लाख ८२ हजार २०० रूपये, गोरेगाव तालुक्यातील ७६२४ विद्यार्थ्यांसाठी ३० लाख ४९ हजार ६०० रूपये, सालेकसा तालुक्यातील ६२९३ विद्यार्थ्यांसाठी २५ लाख १७ हजार २०० रूपये, सडक-अर्जुनी तालुक्यातील ६८८८ विद्यार्थ्यांसाठी २७ लाख ५५ हजार २०० रूपये, तिरोडा तालुक्यातील १० हजार ७११ विद्यार्थ्यांसाठी ४२ लाख ८४ हजार ४०० रूपये मुख्याध्यापकांच्या खात्यात टाकण्यात आले आहे. असे जिल्ह्यातील एकूण ७३ हजार ८६० विद्यार्थ्यांसाठी २ कोटी ९५ लाख ४४ हजार रूपये पाठविण्यात आले आहेत. तरीही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत.