जिल्ह्यातील नववीच्या वर्गातील १४३७ विद्यार्थी गेले कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:20 AM2021-06-17T04:20:41+5:302021-06-17T04:20:41+5:30
गोंदिया : कोरोनामुळे दहावीचा निकाल नववीच्या निकालावरून लावायचा आहे. मागच्या वर्षी नववीत असलेल्यांना पास करून पुढच्या वर्गात टाकण्यात आले. ...
गोंदिया : कोरोनामुळे दहावीचा निकाल नववीच्या निकालावरून लावायचा आहे. मागच्या वर्षी नववीत असलेल्यांना पास करून पुढच्या वर्गात टाकण्यात आले. मागील वर्षी नववीत असलेले २० हजार ७७२ विद्यार्थी पास झाले; परंतु दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १९ हजार ३३५ असल्याने १४३७ विद्यार्थी गेले कुठे, हा प्रश्न पडला आहे.
गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असताना शिक्षणाच्या संदर्भात जिल्हा माघारलेला आहे. साधारणत: इयत्ता नववीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. त्यामुळे पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी दहावीत नक्कीच जातो. सन २०१९-२० या वर्षात नववी वर्गात २० हजार ७७२ विद्यार्थी होते. ते उत्तीर्ण होऊन दहावीत गेले. इयत्ता दहावीच्या परीक्षेला १९ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यातील १ हजार ४३७ विद्यार्थी गेले कुठे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोराेनाच्या संसर्गामुळे सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रात मार्च महिन्यापासून विद्यार्थ्यांसाठी शाळा कुलूप बंद होत्या. त्यावेळी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पार पडल्या. या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील जवळपास २० हजार ७७२ विद्यार्थी नववी उत्तीर्ण झाले. हे सर्व विद्यार्थी दहावीत गेले. दिवाळीच्या वेळी बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरण्याची कार्यवाही करण्यात आली. अंतिम मुदतीपर्यंत गोंदिया जिल्ह्यातील १९ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचे अर्ज केले आहेत.
..........................
पटसंख्येचा घोळ
१) इयत्ता नववीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण केले जात नाही. त्यामुळे इयत्ता पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी शाळाबाह्य झाला तरी त्याला पटसंख्येसाठी शाळाबाह्य दाखिवले जात नाही.
३) दुर्गम भागातील काही शाळांत पटावर विद्यार्थ्यांची नोंदणी असते. मात्र, काही विद्यार्थी वर्षभर शाळेत जात नाहीत. पूर्वी विद्यार्थी पटसंख्येचा घोळ अनेक ठिकाणी दिसून यायचा.
३)आता ऑनलाइन प्रक्रिया झाल्यामुळे व यूडायस तसेच शासनाच्या विविध सॉफ्टवेअरमध्ये विद्यार्थी संख्येचा डेटा अपलोड केला जात असल्याने विद्यार्थी पटसंख्येत पारदर्शकता आली आहे.
.................
स्थलांतरित बालकांमुळे समस्या
-पूर्वीप्रमाणे आजही काही विद्यार्थी मध्येच शाळा सोडतात, याला विवध कारणे आहेत. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने मुले शाळा सोडतात.
- आर्थिक चणचण भासताच विद्यार्थी शाळा सोडून मजुरी करायला लागतात. छोटे-मोठे काम करून कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी तयार होत असल्याने शाळेकडे दुर्लक्ष होते.
- कुटुंबातील सदस्य रोजगारासाठी भटकंती करीत असतात. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या लोकांच्या मुलांची शाळा बुडते.
................
जिल्ह्यात ननवी पास विद्यार्थी- २०७७२
दहावीसाठी अर्ज केलेले विद्यार्थी- १९३३५
...............................
मागच्या वर्षीपासून कोरोनाच्या संकटामुळे दुर्गम भागातील इयत्ता दहावीचे १४३७ विद्यार्थी शाळेच्या संपर्कापासून दूर गेले. शाळांनी सूचना दिली तरीदेखील १४३७ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेचा फाॅर्म भरला नाही. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्याने अनेकांनी मध्येच शाळा सोडली असावी. यामुळे इयत्ता नववी उत्तीर्ण व दहावीच्या परीक्षेसाठी केलेल्या अर्जांच्या संख्येत तफावत आहे.
- प्रदीप समरीत, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. गोंदिया.