लाखो क्विंटल तांदूळ ठेवायचा कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 11:56 PM2018-06-29T23:56:52+5:302018-06-30T00:00:21+5:30
मागील आठ ते दहा वर्षांच्या कालावधीत प्रथमच जिल्ह्यातील शासकीय गोदामे तांदळाने हाऊसफुल झाली आहेत. त्यामुळे नवीन भरडाई केलेला तांदूळ ठेवायचा कुठे असा प्रश्न आता जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील आठ ते दहा वर्षांच्या कालावधीत प्रथमच जिल्ह्यातील शासकीय गोदामे तांदळाने हाऊसफुल झाली आहेत. त्यामुळे नवीन भरडाई केलेला तांदूळ ठेवायचा कुठे असा प्रश्न आता जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. गोदामातील तांदळाची उचल करण्यासंदर्भात अद्याप शासनाने कुठलेच नियोजन केले नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.
गोंदिया जिल्ह्यात राईसमिलची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गोंदिया-भंडारा या दोन जिल्ह्यात धानाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत दोन्ही जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून हमीभावानुसार धान खरेदी केली जाते. त्यानंतर खरेदी केलेला धान भरडाई करण्यासाठी राईसमिल धारकांना निविदा काढून दिला जातो.
राईसमिल धारक धानाची भरडाई करुन तांदूळ जमा करतात. त्यानंतर या तांदळाचा जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केला जातो.
जिल्ह्यात दरवर्षी १३ ते १४ लाख क्विंटल तादंूळ जमा केला जातो. तर यापैकी जिल्ह्यात केवळ ४ लाख क्विंटल तांदळाची मागणी आहे.
त्यामुळे जवळपास १० लाख क्विंटल तांदूळ शासकीय गोदामांमध्ये शिल्लक राहतो. शिल्लक असलेला तांदूळ पुरवठा विभागाकडूृन नियोजन करुन इतर जिल्ह्यात पाठविला जातो. दरवर्षी जिल्ह्याबाहेर तांदूळ पाठविण्याचे नियोजन विभागीय आयुक्त कार्यालयाकडून केले जात होते.
मात्र यावर्षीपासून विभागीय आयुक्त कार्यालयाचे नियोजनाचे अधिकार काढून घेण्यात आले आहे. आता हे अधिकार अन्न व पुरवठा मंत्रालयाकडे आहेत. मात्र या विभागाकडून अद्यापही कुठलेही नियोजन करण्यात आले नाही. शिवाय त्यासंदर्भात कुठलेच आदेश जिल्हा पुरवठा विभागाला देण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ शिल्लक आहे.
सध्या स्थितीत जिल्ह्यातील गोदामांमध्ये २५ हजार मॅट्रीक टन आणि भारतीय खाद्य मंडळाकडे ३५०० मॅट्रीक टन तांदूळ शिल्लक आहे. तर २०१८ मध्ये जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने राईसमिल धारकांना भरडाईसाठी दिलेल्या ५० हजार क्विंटल तांदूळ ३० जूनपर्यंत येणार आहे.
त्यामुळे आधीच गोदामात शिल्लक असलेल्या तांदळाची उचल झाली नसल्याने नवीन भरडाई करुन येणारा ५० हजार क्विंटल तांदूळ ठेवायचा कुठे असा प्रश्न या दोन्ही विभागांपुढे निर्माण झाला आहे.
-तर धानाची भरडाई थांबणार
गोदामांमध्ये शिल्लक असलेल्या तांदळाची उचल करुन गोदाम खाली न केल्यास नवीन तांदूळ ठेवण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. हा तांदूळ तसाच पडून राहिला तर तांदूळ खराब होवू शकतो. राईसमिल धारकांकडे पूर्वीचाच तांदूळ शिल्लक आहे. त्याच तांदळाची उचल झाली नसल्याने उर्वरित धानाची भरडाई थांबवावी लागणार आहे. मात्र यावर अद्यापही शासनाने कुठलाच निर्णय घेतला नसल्याने समस्या निर्माण झाली आहे.
कुठे किती तांदूळ शिल्लक ?
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत दरवर्षी १६ लाख क्विंटल धानाची खरेदी केली जाते. त्यानंतर हे धान भरडाई करण्यासाठी १२५ राईस मिल धारकांकडे पाठविला जातो. राईस मिलधारक धानाची भरडाई करुन तांदूळ तयार करतात. १ क्विंटल धानापासून ६७ क्विंटल तांदूळ तयार होते. सध्या स्थितीत गोंदिया येथील गोदामात १० हजार २५० मॅट्रीक टन, आमगाव ६ हजार मॅट्रीक टन, गोरेगाव १ हजार, सौंदड ५००, देवरी १ हजार, नवेगावबांध १ हजार, अर्जुनी मोरगाव येथील गोदामात ५ हजार मॅट्रीक टन तांदूळ शिल्लक आहे. या गोदामांची जेवढी क्षमता आहे तेवढा तांदूळ गोदामांमध्ये भरला आहे. त्यामुळे नवीन येणार तांदूळ ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्याचे पद रिक्त
गोंदिया येथील जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्याची दोन महिन्यापूर्वी बदली झाली. त्यांच्या जागेवर अद्यापही शासनाने दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली नाही. त्यामुळे सुध्दा अडचण निर्माण होत आहे.
अधिकार कपात व नियोजनाचा फटका
भरडाई केलेला तांदूळ जिल्ह्याबाहेर पाठविण्यासाठी पूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून नियोजन केले जात होते. मात्र यावर्षीपासून शासनाने त्यांचे अधिकार कपात केले. त्यामुळेच भरडाई केलेला लाखो क्विंटल तांदूळ गोदामांमध्ये तसाच पडून आहे. यासंदर्भात या विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता शासनाकडून अद्यापही कुठलेच नियोजन झाले नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले.