८ हजार क्विंटल धान गहाळ केला कोणी? डीएमओ कारवाईनंतर सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 02:18 PM2023-02-16T14:18:54+5:302023-02-16T14:21:29+5:30
धान खरेदी घोटाळ्याची व्याप्ती वाढणार
गोंदिया : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये धान खरेदीत झालेल्या घोळ प्रकरणी मार्केटिंग फेडरेशनने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी मनोज बाजपेयी यांच्यावर सोमवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर कारवाई करताना जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने फेडरेशनचे १० कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवला आहे. पण डीएमओने जो ८ हजार क्विंटल धान कमी दाखविला आहे तो नेमका कुणी गहाळ केला याची आता जिल्ह्यात चर्चा आहे.
मागील खरीप हंगामादरम्यान जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. हा घोळ लोकमतने सर्वप्रथम उघडकीस आणला होता. खरेदी केंद्रावरून खरेदीला केलेला तब्बल ४५ हजार क्विंटल धान गायब असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. यानंतर शासनाने याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, याचा चौकशी अहवाल तब्बल वर्षभरानंतर आला. तर घोळ करणाऱ्या सालेकसा आणि गोरेगाव तालुक्यातील तीन संस्थांवर फौजदारी कारवाई करण्यात आली.
पण या संस्थांना धान खरेदी घोळ करण्यास वाव दिल्याचा ठपका जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी मनाेज बाजपेयी यांच्यावर ठेवला आहे. त्यांनी खरीप हंगामातील धानाची वेळीच उचल करण्यासाठी राइस मिलर्सला डिओ न दिल्याने १४ हजार ४७४ क्विंटल धानाची घट आली. तर घोळ करणाऱ्या संस्थांविरोधात एफआयआर दाखल करताना त्यांनी ८ हजार क्विंटल धान कमी दाखविला. या धानाची किमत १ कोटी ५५ लाख २२ हजार रुपये आहे. तर दंड आकारण्यात आलेल्या संस्थांनी दंड भरला नाही त्यांच्याकडून दंड वसूल केला नाही. तर डीएमओने कमी दाखविलेला ८ हजार क्विंटल धान नेमका गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तीन संस्थांवर मेहेरबानी दाखविणे पडले महाग
मागील खरीप हंगामात तीन सेवा सहकारी धान खरेदी मोठ्या प्रमाणात घोळ केला. या संस्थांवर वेळीच कारवाई करण्याऐवजी डीएमओ बाजपेयी यांनी अभय देण्याचे काम केले. यामुळे फेडरेशनचे ९ कोटी ५१ लाख १९ हजार रुपयांचे नुकसान केले. त्यामुळे त्यांना ही मेहेरबानी दाखविणे महागात पडले.
सखोल चौकशी केल्यास मोठे मासे गळाला
धान खरेदी घोटाळ्याची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात आहे. यात अनेक वरिष्ठ अधिकारीसुद्धा सहभागी असल्याची चर्चा आहे. डीएमओवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता आमचाच सहभाग नाही तर काही वरिष्ठ अधिकारीसुद्धा सहभागी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.