बेरोजगारांची संख्या वाढली असताना २३ ग्रामपंचायतींमध्ये रोहयोचे एकही काम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:20 AM2021-06-10T04:20:12+5:302021-06-10T04:20:12+5:30
गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गोंदिया जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर कामे सुरू आहे. या कामामुळे ग्रामीण ...
गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गोंदिया जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर कामे सुरू आहे. या कामामुळे ग्रामीण जनतेला कोरोना महामारीच्या काळात मोठा आधार मिळाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील ५५७ ग्रामपंचायतींपैकी ५३४ ग्रामपंचायतीत काहीना काही कामे झालीत. परंतु २३ ग्रामपंचायतींमध्ये अजूनही एकाही कामाला सुरुवात झालेली नाही. गोंदिया जिल्ह्यात उद्योगधंदे नाहीत. बेरोजगारी वाढली असतानाही ग्रामपंचायतने रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली नाहीत. कोरोनाच्या संकटामुळे हाताचे काम गेल्याने बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून, ग्रामपंचायतींनी रोजगार हमी योजनेच्या कामांना सुरुवात करायला हवी होती. काहींनी कामाला सुरुवात केली. परंतु थोड्याच मजुरांना काम देऊन काम बंद केले.
......
रोहयोवर शून्य पैसे खर्च केलेल्या ग्रामपंचायती- २३
तालुकानिहाय आकडेवारी
आमगाव- १४
अर्जुनी-मोरगाव- ०३
देवरी- ००
गोंदिया- ०१
गोरेगाव-०१
सडक-अर्जुनी- ०४
सालेकसा- ००
तिरोडा- ००
एकूण- २३
......................................
प्रतिक्रिया
सरपंच काय म्हणतात...
कोरोनाच्या संकटात मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून आम्ही पुढाकार घेतला. आजघडीला आमच्या शिलापूर ग्रामपंचायतचे ४०० मजूर रोहयोच्या कामावर आहेत. रोजी-रोटी मिळावी म्हणून आम्ही रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात केली आहे.
- गरिबा टेंभूरकर, सरपंच, शिलापूर
...............
कोरोनामुळे रोहयोची कामे होऊ शकली नाही. दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदा नागरिकांना रोहयोचे काम देऊ शकलो नाही. पावसाळा संपल्यावर लगेच कामे सुरू करण्याला आम्ही प्राधान्य देऊ. आमगावच्या गावातील लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.
- राजकुमार चव्हाण, सरपंच, बोथली
.................
कोरोनाच्या संकटामुळे आमच्या हाताला काम मिळाले नाही. आधी हातात असलेले काम कोरोनाने हिरावून घेतले. रोजगार हमी योजनेचेही काम सुरू झाले नाही. त्यामुळे पोट कसे भरावे हा प्रश्न आहे.
- अनिता फाये, कामगार, किडंगीपार
........................
कोरोनाच्या काळात रोहयोच्या कामाला सुरुवात करणे अपेक्षित होते. परंतु संकटाच्या काळातही रोहयोचे काम सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे हाताला काम नाही अन् पैसाही नाही.
-रेखा घनश्याम मेंढे, कामगार, किडंगीपार
.......................
कोट
प्रत्येक ग्रामपंचायतींतर्गत मनरेगाची कामे सुरू करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. ज्या ग्रामपंचायतीत कामे सुरू नसतील त्या ग्रामपंचायतीत त्वरित करण्याच्या सूचना मनरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत. आजघडीला गोंदिया जिल्ह्यात एक लाख चार हजार मजूर कामावर आहेत.
- सचिन गोसावी, उपजिल्हाधिकारी, राेहयो