सात हजार रुपयांची लाच घेताना उपसरपंच जाळ्यात
By admin | Published: August 27, 2014 11:40 PM2014-08-27T23:40:31+5:302014-08-27T23:40:31+5:30
अदासी ग्रामपंचायतच्या हद्दीत खरेदी केलेल्या प्लॉटसंबंधी ग्रामपंचायतच्या रेकॉर्डवर नाव चढवून कर आकारणी करून घेण्यासाठी सात हजार रुपयांची लाच घेणारे अदासीचे उपसरपंच
एसीबीची कारवाई : ग्रा.पं. रेकॉर्डवर नाव चढविण्याचा विषय
गोंदिया : अदासी ग्रामपंचायतच्या हद्दीत खरेदी केलेल्या प्लॉटसंबंधी ग्रामपंचायतच्या रेकॉर्डवर नाव चढवून कर आकारणी करून घेण्यासाठी सात हजार रुपयांची लाच घेणारे अदासीचे उपसरपंच मनोहर मंगल दूधबर्वे (४०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.२७) दुपारी १२.१५ वाजता करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार हे माजी सैनिक असून त्यांचा पानठेल्याचा व्यवसाय आहे. सन २०१२ मध्ये त्यांनी व त्यांच्या भावाने मिळून अदासी गावाच्या हद्दीतील १५०० वर्गफूट जागा एक लाख ९० हजार रूपयांत खरेदी केली होती. सदर प्लॉट शासकीय योजनेंतर्गत स्व.पांडुरंग माने रा.अदासी यांना सन १९८७ मध्ये शासनाकडून मिळालेला होता. त्याचे विक्रीपत्र होत नसून ग्रामपंचायतच्या अभिलेखावर केवळ मालकी हक्क हस्तांतरित होते. त्याच नावाने कर आकारणी होत असते. अमृत डोंगरे व इतर सहा जण हे सदर प्लॉटचे वारसदार आहेत.
सदर प्लॉट खरेदी केल्याच्या करारनाम्यानंतर ग्रामपंचायत अदासीच्या रेकॉर्डवर तक्रारदार व त्याच्या भावाचे नाव चढवून कर आकारणी करून घेण्यासाठी मूळ प्लॉटधारकांच्या वारसदारांनी अदासीचे ग्रामसेवक राणे यांच्याकडे डिसेंबर २०१२ मध्ये अर्ज केला होता. मे २०१४ मध्ये ग्रामविकास अधिकारी राणे व उपसरपंच दूधबर्वे यांनी तक्रारदाराला त्यांच्या प्लॉटला लागूनच शासकीय विहीर असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी तुम्हाला रस्ता सोडावा लागेल असे सांगून तसे प्रतिज्ञापत्र द्या, नंतर तुमच्या कामाचे बघू असे सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने २१ मे २०१४ रोजी प्रतिज्ञापत्र तयार केले व ते ग्रामपंचायतमध्ये गेले. त्यावेळी उपसरपंच दूधबर्वे यांनी तक्रारदारास त्यांना मेन रोडची जमीन स्वस्तात मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे व राणेचे प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे एकूण १० हजार रूपये दिल्याशिवाय काम होणार नाही, असे सांगितले.
२२ आॅगस्ट २०१४ रोजी उपसरपंच दूधबर्वे याने तक्रारदाराच्या दुकानात येवून काम करून देण्यासाठी १० हजार रूपयांची पुन्हा मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने दोन हजार रूपये दिले. तसेच २६ आॅगस्ट रोजी उरलेल्या आठ हजार रूपयांमधून एक हजार रूपये घेतले. तसेच उर्वरित सात हजार रूपये घेवून २७ आॅगस्ट रोजी अदासी ग्रामपंचायतमध्ये बोलावले. उपसरपंच दूधबर्वे यांना उर्वरित सात हजार रूपये लाच देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून अदासी गावात सापळा रचण्यात आला.
उपसरपंच दूधबर्वे याने प्लॉटसंबंधी तक्रारकर्त्याचे नाव ग्रामपंचायत रेकार्डवर चढवून घेण्यासाठी पंचासमक्ष सात हजार रूपयांची मागणी केली. तक्रारकर्त्याने ती रक्कम दिली. ही लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. दूधबर्वे याच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)