प्ले ग्रुप, नर्सरीवर नियंत्रण कोणाचे? शुल्कामुळे पालक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 03:20 PM2024-07-22T15:20:04+5:302024-07-22T15:21:14+5:30
शिक्षण विभागाला सरकारी सूचनांची प्रतीक्षा : प्ले ग्रुप, नर्सरीच्या संख्येत झपाट्याने वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पालक हे मुलांच्या शिक्षणाबाबत अधिक सतर्क झाले आहेत. त्यामुळेच ते प्ले ग्रुप, नर्सरीपासूनच बालकांचे शिक्षण सुरू करीत आहेत. काही वर्षांपासून खासगी प्ले ग्रुप, नर्सरी शाळांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे; परंतु आता या वर्गातील समस्याही प्रकर्षाने पुढे येत आहेत. आपल्या शाळेत मुलांची संख्या वाढीसाठी आकर्षक असे प्ले ग्रुप, नर्सरी तयार केल्या जात आहेत. जेणेकरून आपल्याला हवी तशी फी हे पालकांकडून घेऊ लागले आहेत. अशा खासगी प्ले ग्रुप, नर्सरी शाळांवर ना शिक्षण विभागाचे, ना शासनाचे नियंत्रण आहे. अशात अवाजवी शुल्कामुळे पालक त्रस्त झाले आहेत. याबाबत शिक्षण विभागालाही अधिकार नसल्याने अडचण येत आहे. सरकारने प्ले ग्रुप, नर्सरी यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विशेषतः शुल्कासंदर्भात विचार आवश्यक आहे, असे अनेक पालकांचे मत आहे.
प्री - प्रायमरी शाळांची नोंदच नाही
मुले दोन-अडीच वर्षांची झाली की, पालकांना पाल्याच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता सतावते.
यासाठी प्ले ग्रुप, नर्सरी ॐ शाळेची शोधाशोध सुरू करतात; मात्र अशा प्री- प्रायमरी शाळांची नोंदच शिक्षण विभागाकडे केली जात नाही.
नेमका याचाच फायदा प्ले ग्रुप, नर्सरी चालक घेत असून मनमर्जीने पालकांकडून फी वसूल करतात.
शुल्कावर नियंत्रण कोणाचे?
अनेक शहरांत प्ले ग्रुप, नर्सरी शाळांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यांच्याकडून घेतली जाणारी फी, येथील विद्यार्थ्यांची नोंद याबाबत शिक्षण विभागाकडे कोणतीच माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे पालकांकडून घेणाऱ्या फीबाबत कोणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे पालक संताप व्यक्त करीत आहेत.
२५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत शुल्क
शहरी भागासह ग्रामीण भागातही प्ले ग्रुप, नर्सरी शाळांचे पेव फुटले आहे. या शाळांवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे अवाच्या सव्वा शुल्क आकारणी पालकांकडून केली जाते. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात शुल्क अधिक असते. वर्षाला २५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत शुल्क आकारले जाते. विशेष म्हणजे, पालकही भरतात.
तक्रार कोठे करायची?
मुले अडीच वर्षांची झाली की शाळेची आवड लागावी यासाठी प्ले ग्रुप, नर्सरीत पालक मुलांना पाठवतात. या प्ले ग्रुप, नर्सरी शाळेत मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाते; मात्र अधिक प्रमाणात घेत असलेल्या शुल्काबाबत तक्रार कोठे करायची हा प्रश्न पालकांना उपस्थित होत आहे.
पालक म्हणतात...
"मुलांच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता प्रत्येक पालकाला असते. त्यामुळे आपल्या मुलाला लहानपणापासून चांगले शिक्षण मिळावे, अशी अपेक्षा असते. यासाठी कितीही खर्च करण्यास पालक तयार असतात. आता प्ले ग्रुप, नर्सरी यांची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे या शाळेत मुलांना पाठवले जाते. शुल्कही अधिक घेतले जाते."
- गजानन शेंडे, पालक, शंभुटोला
"शहरात प्ले ग्रुप, नर्सरी शाळांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे खरे आहे. या शाळांचे नियंत्रण अजून कोणाकडेही नाही. शासनाने नवे शैक्षणिक धोरण लागू केले. यामध्ये अशा शाळांवर शिक्षण विभागाचे नियंत्रण राहणार आहे, असे म्हटले आहे. या शाळेची नोंदणी ही शिक्षण विभागाकडे नसल्याने तक्रार कुठे करायची, हा प्रश्न पालकांना सतावत आहे."
- अतुल फुंडे, पालक, पदमपूर