धान खरेदीतील अनियमिततेस जबाबदार कोण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 05:00 AM2020-07-27T05:00:00+5:302020-07-27T05:00:37+5:30
जिल्ह्यात यंदा शासकीय धान खरेदी केंद्रावर खरीप आणि रब्बी हंगामात एकूण ५७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली. या विक्रमी धान खरेदीने मागील वीस ते पंचविस वर्षातील धान खरेदीचे रेकार्ड मोडले आहे. विक्रमी धान खरेदीने खरोखरच जिल्ह्यात ऐवढे धानाचे उत्पादन खरोखरच उत्पादन झाले का हे सुध्दा विचार करण्यास भाग पाडले आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर यंदा हमीभाव आणि बोनस मिळाल्याने धानाला चांगला दर मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत यंदा रब्बी आणि खरीप हंगामात खरेदी केलेल्या धान खरेदी मोठ्या प्रमाणात घोळ असल्याची ओरड सुरु होती. त्यातच या खरेदी केंद्राचा उपयोग शेतकऱ्यांना कमी आणि खासगी व्यापाऱ्यांनी अधिक करुन घेतला. ही बाब जिल्हा प्रशासनाने केलेल्या चौकशीत सुध्दा स्पष्ट झाली आहे. त्यामुळे शासकीय धान खरेदीतील अनियमिततेस नेमके जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात यंदा शासकीय धान खरेदी केंद्रावर खरीप आणि रब्बी हंगामात एकूण ५७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली. या विक्रमी धान खरेदीने मागील वीस ते पंचविस वर्षातील धान खरेदीचे रेकार्ड मोडले आहे. विक्रमी धान खरेदीने खरोखरच जिल्ह्यात ऐवढे धानाचे उत्पादन खरोखरच उत्पादन झाले का हे सुध्दा विचार करण्यास भाग पाडले आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर यंदा हमीभाव आणि बोनस मिळाल्याने धानाला चांगला दर मिळाला. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनी सुध्दा या संधीचा पुरेपूर फायदा करुन घेतला.शेतकऱ्यांचे सातबारा गोळा करुन आणि धान खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांना हाताशी घेवून हजारो क्विंटल धानाची विक्री केली. ही बाब सुध्दा जिल्हा प्रशासनाने नुकत्याच केलेल्या चौकशीत स्पष्ट झाली आहे. मात्र ज्यावेळी व्यापाऱ्यांचा धान खरेदी केला जात आहे ही ओरड वाढली तेव्हा प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नाही. काही खरेदी केंद्रावरुन थेट ट्रक धर्मकाट्यावर पाठवून तो धान राईस मिलमध्ये पाठविण्यात आला. हा प्रकार स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास येऊन सुध्दा कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे धान खरेदीतील अनियमिततेस नेमके जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मध्यप्रदेश, छत्तीसगडचा धानाची जिल्ह्यात विक्री
यंदा खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात लगतच्या छत्तीसगड, मध्यप्रदेशातील धानाची मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यात आली.त्यामुळे जिल्ह्यातील धान खरेदीचा आकडा यंदा एकदम फुगला. हा प्रकार या राज्याच्या सीमावर्ती भागातील शासकीय धान खरेदी केंद्रावर झाला.धानाच्या गुणवत्तेची तपासणी केल्यास याचे सुध्दा बिंग फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अधिकाऱ्यांना फोन उचलण्याची अॅलर्जी
जिल्ह्यातील बऱ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सध्या फोन उचलण्याची अॅलजी झाल्याचे चित्र आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी असो वा आरोग्य विभागाचे अधिकारी यांना महत्त्वपूर्ण माहिती घेण्यासाठी फोन केला असता ते कुठलाच प्रतिसाद देत नाही. मात्र त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा सुध्दा वचक नाही.शासकीय धान खरेदी संदर्भात करण्यात आलेल्या चौकशीची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून घ्या असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पण त्यानंतरही जिल्हा पुरवठा अधिकारी फोन उचलून माहिती देत नसल्याने जिल्हा प्रशासनावर नेमका वचक कुणाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.