क्षेत्राच्या खुंटलेल्या विकासाला जबाबदार कोण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 06:00 AM2019-10-18T06:00:00+5:302019-10-18T06:00:11+5:30
चंद्रिकापुरे म्हणाले मागील निवडणुकीत पराभव झाल्याने आपण त्यांची खंत मानून गप्प बसलो नाही. उलट तेवढ्याच जोमाने मतदारसंघात सक्रीय झालो. कुठल्याही पदावर नसताना सुध्दा मतदारसंघातील शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी मला सांगण्याची गरज नसून ते मतदारांना देखील ठाऊक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : भाजप सरकारच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत अर्जुनी मोरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र या क्षेत्रात सिंचन,पायाभूत सुविधांचा दुष्काळ आणि रोजगाराचा प्रश्न कायम असल्याची ओरड स्वत: मतदार करीत आहे. मागील पाच वर्षात या क्षेत्राचा विकास खुंटला असून याला जवाबदार कोण आहे असा सवाल अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला.
निवडणूक प्रचारार्थ गुरूवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दाभना, निमगाव, खांबी, इंजोरी, पिंपळगाव, देवलगाव, येरंडी, बाराभाटी, अरतोंडी येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होत. या वेळी प्रामुख्याने भागवत नाकाडे,गंगाधर परशुरामकर,अविनाश काशिवार,आनंद जांभुळकर, यशवंत गणविर, दादा संग्रामे, अरूणा मेश्राम, संजय गेडाम, नरेंद्र रंगारी, गिरीश पालीवाल,आर.के.जांभुळकर, दीपक सोनवाने उपस्थित होते. मनोहर चंद्रिकापूरे यांनी काही गावांमध्ये पदयात्रा आणि काही ठिकाणी प्रचारसभा घेऊन मतदारांशी संवाद साधला.
चंद्रिकापुरे म्हणाले मागील निवडणुकीत पराभव झाल्याने आपण त्यांची खंत मानून गप्प बसलो नाही. उलट तेवढ्याच जोमाने मतदारसंघात सक्रीय झालो. कुठल्याही पदावर नसताना सुध्दा मतदारसंघातील शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी मला सांगण्याची गरज नसून ते मतदारांना देखील ठाऊक आहे. मतदारसंघातील मतदारांनी आपल्यावर व्यक्त केलेल्या विश्वासामुळेच आपण पुन्हा निवडणूक रिंगणात आहोत.आपली ताकद आणि शिदोरी ही मतदारसंघातील मतदार आणि त्यांचे प्रेम हिच आहे.त्यामुळे तो विश्वास यापुढे सुध्दा कायम ठेवतील असा आपल्याला विश्वास आहे. या क्षेत्राचे विद्यमान लोकप्रतिनिधी मागील दहा वर्षांत या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्याचा दावा करीत आहे. मात्र ती झाली असती तर या क्षेत्राचा चेहरा मोहरा का बदलला नाही. झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे भिजत घोंगडे का कायम आहे? राईस पार्कची स्थापन करुन स्थानिकांना रोजगाराच्या संधी का उपलब्ध करुन देण्यात आल्या नाहीत. मतदारसंघातील रस्त्यांची दुदर्शा का झाली आहे. मागील दहा वर्षांत एकही मोठा प्रकल्प या मतदारसंघात का आला नाही.
या सर्व प्रश्नांची उत्तरे ते जनतेला का देत नाही असा सवालही चंद्रिकापुरे यांनी केला. त्यामुळेच आघाडी सरकारचा मोठ्या घोषणांवर नव्हे तर प्रत्यक्ष विकास कामे करण्यावर विश्वास असल्याचे सांगितले. या मतदारसंघातील मतदारांनी आपल्याला संधी दिल्यास या क्षेत्राचा नक्कीच कायापालट करु अशी ग्वाही त्यांनी दिली.