सभापती-उपसभापती कोण ?
By admin | Published: July 11, 2015 01:59 AM2015-07-11T01:59:45+5:302015-07-11T01:59:45+5:30
सालेकसा पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारणसाठी खुले झाले आहे. त्यामुळे चार सदस्यांपैकी कोणाला सभापती बनविण्यात यावे ...
काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू : वाघमारे, लिल्हारे, फाफनवाडे शर्यतीत
विजय मानकर सालेकसा
सालेकसा पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारणसाठी खुले झाले आहे. त्यामुळे चार सदस्यांपैकी कोणाला सभापती बनविण्यात यावे आणि उपसभापतीपद कोणत्या पक्षाला देण्यात यावे, याबद्दल काँग्रेस पक्षामध्ये खलबते सुरू आहेत.
काँग्रेसचे चारही सदस्य आरक्षित गटातून निवडून आले आहेत आणि अडीच वर्षानंतर कोणत्या संवर्गासाठी आरक्षण निघेल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत कोणाच्या गळ्यात सभापतीपदाची माळ टाकावी यासाठी काँग्रेसला गहण विचारविमर्श करावा लागत आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यात एकूण आठपैकी काँग्रेस चार, भाजप तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक अशी सदस्य संख्या निवडून आली. आठपैकी चार महिला सदस्य राखीव होत्या. परंतु भाजपने सर्वसाधारण पदासाठी महिला उमेदवार लढविल्या आणि त्या निवडून आल्या. त्यामुळे पाच महिला आणि तीन पुरुष अशी रचना पं.स.ची झाली आहे. तिन्ही पुरुष सदस्य काँग्रेस पक्षाचे असून चौथा सदस्य महिला आहे. यात पुरुष सदस्य नामाप्र (ओबीसी), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती राखीव आहेत, तर महिला सदस्य अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या एक सदस्य महिला आणि भाजपचे तिन्ही सदस्य महिलाच आहेत. त्यामुळे उपसभापतीपद महिलेकडेच जाईल, हे जवळपास निश्चित वाटत आहे. अशात काँग्रेसला तीन पुरुषांपैकी एकाला सभापती बनवावे लागेल. यात ज्येष्ठ कार्यकर्ते राहिलेले दिलीप वाघमारे आणि भरत लिल्हारे प्रमुख दावेदार राहतील. हिरालाल फाफनवाडेसुद्धा शर्यतीत कायम राहतील. दिलीप वाघमारे अनुसूचित जातीचे, भरत लिल्हारे नामाप्रचे आणि हिरालाल फाफनवाडे अनुसूचित जमातीचे आहेत. यापैकी कोणालाही सभापती बनविले आणि अडीच वर्षानंतर त्याच संवर्गाचे आरक्षण आले तर वाघमारे आणि लिल्हारे यांना पुन्हा अडीच वर्ष असे पूर्ण पाच वर्षांची संधी मिळण्याची शक्यता आहे. फाफनवाडे यांना आता संधी दिली तर पुढे तोच संवर्ग आल्यावर काँग़्रेसकडे महिला अनुसूचित जमातीचा विकल्प आहे. या सगळ्या गोष्टींवर विचार करूनच काँग्रेस शेवटचा निर्णय घेईल.
भाजपचा फॉर्मुला काँग्रेस अंगिकारेल का?
आठ सदस्यीय पंचायत समितीमध्ये सत्तेच्या बहुमतासाठी पाच सदस्य आवश्यक आहेत. परंतु काँग्रेसकडे चार सदस्य आहेत. एका सदस्याची गरज आहे. यासाठी काँग्रेसला भाजप किंवा राष्ट्रवादीकडे उपसभापतीपद देवून बहुमत पूर्ण करावे लागेल. २००५ च्या निवडणुकीत भाजपला चार, काँगे्रसला तीन आणि शिवसेनेचा एक सदस्य निवडून आला होता. तेव्हा भाजपचा सभापती आणि शिवसेनेचा उपसभापती बनेल, असे प्रत्येकाला वाटत होते. परंतु भाजपने तसे न करता शिवसेनेला दुर्लक्ष करीत काँग्रेसकडे दोन्ही वेळा उपसभापतीपद दिले. तेव्हा पहिल्यावेळी भाजपचे खेमराज लिल्हारे सभापती आणि काँग्रेसचे सुकलाल राऊत उपसभापती बनले होते. अडीच वर्षानंतर भाजपचे तुकाराम बोहरे सभापती आणि काँग्रेसच्या डिलेश्वरी कटरे उपसभापती बनल्या होत्या. अशाच फार्मुला भाजपने वापरला तर काँग्रेसचा सभापती आणि भाजपकडून उपसभापती पदावर प्रतिभा परिहार किंवा प्रमिला दसरीया यांची वर्णी लागू शकते. किंवा दुसऱ्यांदा जया डोये यांचाही विचार होऊ शकतो. जर राष्ट्रवादीला सोबत घेतले तर एकमेव सदस्य राजकुमारी विश्वकर्मा यांना उपसभापती पद निश्चित आहे. मात्र पुढील अडीच वर्षात तेच की कोणी दुसऱ्याला संधी हा प्रश्न कायम राहील. जिल्हा परिषदेतसुद्धा खंडित जनादेश असल्याने कोणाची आघाडी होते अन् तालुक्याला काय आदेश मिळेल, याची वाटसुद्धा तालुक्याचे वरिष्ठ नेते बघत आहेत.