पक्ष्यांशी बोलणारा अवलिया आला गोंदियाच्या नागझिऱ्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:01 PM2019-11-08T12:01:18+5:302019-11-08T12:04:03+5:30
गोंदियाच्या नागझिऱ्यात पिटेझरी या इवल्याशा गावात या अवलियाने वनकुटी बांधून नागझिरा परिसराला आपली कर्मभूमीच मानली आहे. या व्रती निसर्ग अभ्यासकाच नाव किरण वसंत पुरंदरे असे आहे.
संतोष बुकावन।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ३५ वर्षे निसर्ग आणि पर्यावरण अभ्यासात गेली. शहरी जीवन, सिमेंट काँक्रीटच्या घरातील वास्तव्य व स्वत:चे कुटुंब सोडून ते जंगलात राहायला आले. नागझिऱ्यातील पशु, पक्षी आणि कृमी जणू त्यांना खुणावत असतात. त्यामुळेच त्यांचे मन पुण्यात रमत नाही. जंगलातील निरव शांतता, कोकिळेचा मंजुळ स्वर, आल्हाददायक वातावरण जणू त्यांच सर्वस्वच. ज्या आदिवासींच्या सानिध्यात दिवस घालविले त्याची ओढ ही अविस्मरणीयच. या अवलियाने पिटेझरी या इवल्याशा गावात वनकुटी बांधून नागझिरा परिसराला आपली कर्मभूमीच मानली आहे. या व्रती निसर्ग अभ्यासकाच नाव किरण वसंत पुरंदरे असे आहे.
किरण पुरंदरे हे निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्राचे अभ्यासक, पक्षीतज्ज्ञ व प्रसिद्ध लेखक आहेत. निसर्गाचा अभ्यास, जतन आणि संवर्धन यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वाहिलेलं आहे. पक्षी, प्राणी व जैविक विविधता या विषयांवर त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘आभाळवाटांचे प्रवासी’ आणि ‘सखा नागझिरा’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळाला आहे. निसर्ग आणि पर्यावरण अभ्यासाच्या निमित्ताने इंग्लंड, नेपाळ, केनिया व थायलंड या देशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. देशभरातील जंगले पालथी घालून ते पक्षी जीवनावर अभ्यास करीत आले आहेत. वर्षभरात ऋतुमानानुसार जंगलातील वन्यजीवन व वनसंपदेमध्ये कसे बदल होत जातात हे जाणून घेण्याच्या जिज्ञासेपोटी नागझिरा जंगलात राहून त्यांनी ४०० दिवस अभ्यास केला. या जंगलात आदिवासींच्या सहभागातून वनसंवर्धनाचा त्यांचा अनोखा उपक्र म सुरू आहे. येथील गोंड आदिवासींमध्ये जागृती करु न त्यांना रोजगाराची साधनेही त्यांनी मिळवून दिली आहेत. विद्यार्थ्यांना निसर्ग संरक्षणाचे धडे देण्यासाठी वर्षभर त्यांची भटकंती सुरू असते.
नागझिºयाच्या जंगलाचे त्यांना प्रचंड वेड आहे. येथे जीवनातील बरेचसे बारकावे त्यांनी आत्मसात केले. ३५ वर्षाच्या निसर्ग भ्रमंतीत त्यांनी नागझिरा अभयारण्यातल्या वाकडा बेहेडा यास्थळी पहिल्यांदाच तांबुस रंगाचा शिंगळा बघितला. मोह हा येथील कल्पवृक्ष आहे. मात्र दरवर्षी लावल्या जाणाऱ्या विनाशकारी आगी, अतिचराई, सरपण व वृक्षतोडीमुळे शृंगी घुबडांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याचे त्यांनी अनुभवले. घुबड पक्ष्याला वाचिवणे आवश्यक असल्याचे ते सांगतात.
अन् जीवन सार्थकी लागले
चांगले विचार, चांगले संस्कार रु जविण्याचा जिवापाड प्रयत्न केला. दिसेल तो पक्षी पाडायचा, भाजायचा आणि खायचा एवढंच माहित असलेले गोंड आता कुठे बदलू लागले आहेत. किरणदादा आहेत अशी भीती त्यांच्या मनात असते. एकदा पिटेझरी पर्यटन संकुलाच्या आवारात उड्या मारत शाळकरी मुलं भेटायला आली. त्यांनी मला शाळेत घोघो पिंजरा आला होता ते सांगितले. त्याला पाणी पाजून फोटो काढले व सोडून दिल्याचे सांगितले. मुलांचा हा उत्स्फूर्त संवाद ऐकून आपला जन्म सार्थकी लागल्याची अनुभूती त्या दिवशी आली. निसर्गप्रेमाचं बीज लहान मुलांच्या रूपात अंकुरलं होतं. कुणीही न सांगता त्यांनी एक घुबड वाचवलं होतं. अपेक्षित या बदलाने खरोखरच मी सुखावलो असे ते सांगतात.