आज होणार स्पष्ट गावचा प्रमुख कोण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 05:00 AM2021-02-12T05:00:00+5:302021-02-12T05:00:02+5:30
ग्रामपंचायतच्या राजकारणातून अनेक नेते घडल्याची उदाहरणेसुध्दा जिल्ह्यात आहेत. तसेच ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायतची निवडणूक महत्त्वपूृर्ण समजली जाते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीकडे गांभीर्याने बघतात. जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. मात्र, यंदा राज्य निवडणूक आयोगाने सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर केले. त्यामुळे सदस्य निवडून आले तरी सरपंचपदी कोण आरुढ होणार हे स्पष्ट झाले नव्हते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला पार पडली. त्यानंतर २८ जानेवारीला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. आता आरक्षणानुसार सरपंच व उपसरपंचपदी सदस्यांची निवड करण्याची प्रक्रिया शुक्रवारी (दि.१२) पार पडणार आहे. त्यामुळे आपल्या गावचा प्रमुख कारभारी कोण, याचे चित्र शुक्रवारीच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या निवडप्रक्रियेला घेऊन फोडाफोडीच्या राजकारणाला जोर आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या आणि येथूनच पुढे जि. प. अध्यक्ष, आमदार, खासदार आणि मंत्री पदापर्यंत मजल मारली जाते.
ग्रामपंचायतच्या राजकारणातून अनेक नेते घडल्याची उदाहरणेसुध्दा जिल्ह्यात आहेत. तसेच ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायतची निवडणूक महत्त्वपूृर्ण समजली जाते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीकडे गांभीर्याने बघतात. जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. मात्र, यंदा राज्य निवडणूक आयोगाने सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर केले. त्यामुळे सदस्य निवडून आले तरी सरपंचपदी कोण आरुढ होणार हे स्पष्ट झाले नव्हते. त्यानंतर २८ जानेवारीला आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता शुक्रवारी (दि. १२) सरपंच आणि उपसरपंचाची निवडप्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायतनिहाय निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारी १२ वाजता जिल्ह्यातील १७५ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि उपसरपंच निवडण्याची प्रक्रिया निवडून आलेले सदस्य पार पाडणार आहेत. त्यामुळे या निवडप्रक्रियेला घेवून गावकऱ्यांतसुध्दा प्रचंड उत्साह आहे.
सत्ता कोणाची होणार स्पष्ट
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपले सदस्य निवडून आल्याचा दावा केला होता. तसेच निवडून आल्यानंतर जो-तो आपलाच म्हणत सुटला होता. मात्र, आता शुक्रवारी सरपंचपदाची निवड केली जाणार असून कोणत्या पक्षाचा सदस्य ग्रामपंचायमध्ये विराजमान होतो यानंतरच त्या ग्रामपंचायतवर कोणत्या पक्षाची सत्ता हे देखील स्पष्ट होणार आहे.
पर्यटनाला गेलेले सदस्य परतणार आज
सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडीदरम्यान फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदस्यांमध्ये फूट पडू नये यासाठी निवडून आलेल्या सर्व पॅनलच्या सदस्यांनी खबरदारी घेतली आहे. यासाठी सरपंचपदाची निवडणूक जाहीर होईपर्यंत आपल्या सदस्यांना बाहेरगावी पर्यटनाला पाठविले होते. आता हे सर्व सदस्य शुक्रवारी आपल्या गावी परतणार आहेत.
सर्व राजकीय पक्षांचे लक्ष
जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाची सत्ता स्थापन व्हावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आता सरपंच निवडीदरम्यान या सर्वांचा कस लागणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मागील तीन चार दिवसांपासून यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.