Gondia : पंचायत समिती सभापतिपदी विराजमान होणार कोण? राजकीय घडामोडींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 02:44 PM2022-05-05T14:44:00+5:302022-05-05T14:47:57+5:30

तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील ८ पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती पदांची निवडणूक ६ मे रोजी होत आहे.

Who will be the Panchayat Samiti Chairman? | Gondia : पंचायत समिती सभापतिपदी विराजमान होणार कोण? राजकीय घडामोडींना वेग

Gondia : पंचायत समिती सभापतिपदी विराजमान होणार कोण? राजकीय घडामोडींना वेग

googlenewsNext
ठळक मुद्देशुक्रवारी होणार चित्र स्पष्ट

गोंदिया : जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणूक ६ मे रोजी होणार आहे. या निवडणुकीला घेऊन जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आठपैकी अर्जुनी मोरगाव आणि सालेकसा पंचायत समितीचे चित्र स्पष्ट झाले असून, उर्वरित सहा पंचायत समित्यांच्या सभापतिपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्व जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील ८ पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती पदांची निवडणूक ६ मे रोजी होत आहे. अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या सविता कोडापे यांची वर्णी लागणार आहे, तर सालेकसा पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असून, काँग्रेसच्या प्रमिला गणवीर यांची वर्णी लागणार आहे. उर्वरित सहा पैकी समित्यांचे सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले आहे. त्यामुळे या पंचायत समिती सर्वच पक्षांना संघर्ष करावा लागणार आहे. सहापैकी पाच पंचायत समित्यांमध्ये भाजपला बहुमत आहे. त्यामुळे भाजपमध्ये सर्वाधिक चढाओढ आहे, तर कोणत्याही एका सदस्याचे नाव निश्चित करताना पक्षाच्या नेत्यांनासुद्धा घाम फुटत आहे.

सहापैकी आमगाव, गोरेगाव व गोंदिया पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण आहे. देवरी तिरोडा आणि सडक अर्जुनी येथे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. आमगाव आणि गोरेगावमध्ये भाजपचे बहुमत आहे; पण जिल्ह्यातील २८ सदस्य असलेली गोंदिया पंचायत समिती ही सर्वांत मोठी पंचायत समिती आहे. येथील निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजप व आ. विनोद अग्रवाल यांच्या जनता पक्षाला प्रत्येकी दहा दहा जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी १५ हा आकडा पार करावा लागणार आहे. राष्ट्रवादीचे पाच सदस्य असून, ते काय भूमिका घेतात यावर गोंदिया पंचायत समितीतील सत्तेचे समीकरण ठरणार आहे.

सदस्यांच्या समाधानासाठी उपसभापती पदाचा फाॅर्म्यूला

सभापती पदासाठी उमेदवारांमध्ये जोरदार चढाओढ सुरू असताना पक्ष नेतृत्वाने एकाला सभापती, तर दुसऱ्याला उपसभापतिपद देऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उपसभापती पद आरक्षित नाही. त्यामुळेच दावेदारांचे समाधान करण्यात हे पद महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

पंचायत समिती ठरविणार जिल्हा परिषदेचे चित्र

पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडीसाठी आता केवळ दिवस उरला आहेत, तर काही दिवसांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवड होणार आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीच्या निकालावरून जिल्हा परिषदेचे समीकरण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेेच लक्ष लागले आहे.

सदस्यांवर सर्वच पक्षांचा वॉच

पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक उद्या, ६ मे रोजी होऊ घातली आहे. दरम्यान, आपल्या पक्षाचे सदस्य वेळेवर दगाफटका करू नये यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून काळजी घेतली जात आहे. यासाठी काही सदस्यांना पर्यटनाला पाठविण्यात आल्याची चर्चा आहे.

Web Title: Who will be the Panchayat Samiti Chairman?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.