रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार कोण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 05:00 AM2021-10-31T05:00:00+5:302021-10-31T05:00:20+5:30
जिल्ह्यातील २७ रेती घाटांपैकी १६ रेती घाटांचे लिलाव पर्यावरण विभागाने मंजुरी न दिल्याने झाले नाही. मात्र, यानंतरही या रेती घाटांवरून सर्रासपणे रेतीचा उपसा सुरू आहे. जिल्ह्यात सध्या एक ट्रॅक्टर रेतीचे दर ८ हजार रुपये सुरू आहे. घाटांचे लिलाव झाले नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात या रेती घाटावरून रेतीची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे ही रेती कुठल्या घाटावरून येत आहे हे मात्र समजण्यापलीकडे आहे. जिल्ह्यात रेतीची तस्करी जाेमात सुरू असून कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात सध्या रेतीची तस्करी जोरात असून यातून अनेक तस्कर गब्बर झाले असून, ते सबकुछ मॅनेज है ची भाषा करीत आहे. रेती घाटावरून रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी रेती तस्करांनीच वेळा देखील ठरविल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून जिल्हा खनिकर्म विभागाकडून केवळ बघ्याची भूमिका स्वीकारली असल्याने रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील २७ रेती घाटांपैकी १६ रेती घाटांचे लिलाव पर्यावरण विभागाने मंजुरी न दिल्याने झाले नाही. मात्र, यानंतरही या रेती घाटांवरून सर्रासपणे रेतीचा उपसा सुरू आहे. जिल्ह्यात सध्या एक ट्रॅक्टर रेतीचे दर ८ हजार रुपये सुरू आहे. घाटांचे लिलाव झाले नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात या रेती घाटावरून रेतीची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे ही रेती कुठल्या घाटावरून येत आहे हे मात्र समजण्यापलीकडे आहे. जिल्ह्यात रेतीची तस्करी जाेमात सुरू असून कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. मात्र, खनिकर्म विभागाचे अधिकारी केवळ नाममात्र कारवाई करून मोकळे होण्यातच धन्यता मानत आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेती तस्करांना मोकळे रान आहे. रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी कोण पुढाकार घेणार असा सवाल केला जात आहे.
दखल घेणार कोण?
- रेती तस्करीत राजकारणाशी संबंधित काही जण रेती तस्करीत सहभागी असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर या सर्व प्रकाराची दखल घेऊन कारवाई करणार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कारवाई करताच वरिष्ठांचे फोन
- रेतीची तस्करी करताना वाहने पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारीच तो आपला माणूस आहे, कारवाई करू नका असे सांगून कारवाई न करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांचा सुद्धा पर्याय नसतो. दोन दिवसांपूर्वीच असा प्रकार एका तालुक्यात घडला. यासाठी थेट जिल्हा खनिकर्म विभागातून फोन आल्याची माहिती आहे.
रेती तस्कर म्हणतात सबकुछ मॅनेज है
- मागील तीन-चार महिन्यांपासून जिल्ह्यात रेतीची तस्करी जोरात सुरू आहे. त्यामुळे रेती तस्कर चांगले मालामाल झाले असून, त्यांच्याकडील वाहनांची संख्यादेखील दुप्पट झाली आहे. तर त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने रेतीची तस्करी सुरळीत आहे. त्यामुळे ते छातीठोकपणे सबकुथ मॅनेज असल्याचे सांगत आहे.