राष्ट्रीय उद्यानाच्या संजयकुटीत वाळवीचे साम्राज्य,लक्ष देणार कोण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 05:00 AM2021-10-11T05:00:00+5:302021-10-11T05:00:07+5:30
सुरुवातीच्या काळात संजयकुटी ही इमारत संपूर्णतः लाकडी होती. ही इमारत एकांतवासात असल्याने पर्यटक येथे आकर्षणापोटी आवर्जून हजेरी लावतात. काही वर्षांपूर्वी या इमारतीला अशीच वाळवी लागली होती. तेव्हा ज्या लाकडांवर ही वास्तू उभी होती ते मोठे लाकडी खांब काढून त्याऐवजी सिमेंटचे खांब उभारण्यात आले होते. या खांबांच्या खालच्या भागापासून तर अगदी टोकापर्यंत वाळवीचे थर दिसून येत आहेत. सिमेंटच्या खांबांवर लाकडी व बांबूने तयार केलेली वास्तू आहे.
संतोष बुकावन
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात असलेल्या संजयकुटीत वाळवीचे साम्राज्य असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी वर्ग दोन पासून तर वर्ग चारचे अनेक कर्मचारी नियुक्त आहेत. यांच्यावर शासनाचे दरमहा लाखों रुपये खर्च होतात. मात्र त्यांच्या निष्क्रियतेमुळे राष्ट्रीय उद्यानातील वास्तूला धोका निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय उद्यानाच्या निसर्गरम्य परिसरात संजयकुटी नामक वास्तू आहे. ही इमारत व सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटक नौकाविहार अथवा स्वतःच्या साधनाने तिथे जातात. या इमारतीचे लोकार्पण तत्कालीन वन, स्वास्थ व पाटबंधारे राज्यमंत्री सतीश चतुर्वेदी तसेच महसूल, पुनर्वसन व राजशिष्टाचार मंत्री अजहर हुसेन यांचे हस्ते २१ डिसेंबर १९८१ रोजी झाले होते. सुरुवातीच्या काळात संजयकुटी ही इमारत संपूर्णतः लाकडी होती. ही इमारत एकांतवासात असल्याने पर्यटक येथे आकर्षणापोटी आवर्जून हजेरी लावतात. काही वर्षांपूर्वी या इमारतीला अशीच वाळवी लागली होती. तेव्हा ज्या लाकडांवर ही वास्तू उभी होती ते मोठे लाकडी खांब काढून त्याऐवजी सिमेंटचे खांब उभारण्यात आले होते. या खांबांच्या खालच्या भागापासून तर अगदी टोकापर्यंत वाळवीचे थर दिसून येत आहेत. सिमेंटच्या खांबांवर लाकडी व बांबूने तयार केलेली वास्तू आहे. ही वाळवी बहुधा लाकडांवर अधिक दिसून येते. त्यामुळे सिमेंटच्या टोकावरून लाकूड अथवा बांबूपर्यंत पोहोचणे अगदी शक्य आहे. यामुळे ही वास्तू वाळवीने पोखरून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रीय उद्यान व येथे उपलब्ध असलेल्या प्रत्येक बाबींच्या संरक्षणासाठी वनविभागाचे कर्मचारी नियुक्त आहेत. त्या कर्मचाऱ्यांचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे कर्मचारी केवळ स्वतःचे उदरभरण करण्याच्या उद्देशाने वेतनासाठीच नियुक्त आहेत का ? असा प्रश्न पर्यटक विचारत आहेत.