शेतकऱ्यांच्या समस्यांची कोण घेणार दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:33 AM2021-08-21T04:33:24+5:302021-08-21T04:33:24+5:30
मुंडीकोटा : निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. महागाई, मजुराचा खर्च, रासायनिक खते, ट्रॅक्टर यांचे ...
मुंडीकोटा : निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. महागाई, मजुराचा खर्च, रासायनिक खते, ट्रॅक्टर यांचे दर यावर्षी गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाहीत, खर्च जास्त उत्पन्न कमी, अशी गंभीर परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.
शेतकरी रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतीची मशागत करीत असतो. त्यावर तो आपला वर्षभराचा उदरनिर्वाह करीत असतो. शेतकऱ्यांच्या धान पिकाला हमीभाव मिळावा यासाठी जिल्ह्यात शासनाच्यावतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. मागील वर्षीचा विचार केल्यास खरीप हंगामातील धान पिकांचे बोनस फक्त ५० टक्के मिळाले आहे. पण अर्धा बोनस पत्ताच नाहीत, शेतकरी चातकासारखी बोनसची प्रतीक्षा करीत आहेत. बोनस खात्यावर जमा झाले किंवा नाही या करीता दररोज बँकेच्या चकरा मारीत असून आल्या पावलीच परत जात आहे. मुंडीकोटा येथे विविध सेवा सहकारी संस्था मुंडीकोटा यांना २०२०-२१ ला खरीप धानाची खरेदी करण्याकरिता आदेश दिले होते. त्यामुळे त्यांनी धान खरेदीला सुरुवात केली. मात्र अद्यापही खरीप आणि रब्बी हंगामातील धानाची उचल करण्यात आली नाही. त्यामुळे गोदामांमध्ये धान तसाच पडून आहे. शेतकऱ्यांच्या समस्येकडे शासनाने लक्ष देऊन बोनस आणि थकीत चुकाऱ्याची रक्कम त्वरित देण्याची मागणी केली आहे.