यंदाच्या निवडणुकीत मतदार कुणाला कौल देणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 03:45 PM2021-12-02T15:45:40+5:302021-12-02T15:47:51+5:30
एकोडी हा जिल्हा परिषद क्षेत्र गोंदिया व तिरोडा या तालुक्यांच्या मध्य ठिकाणी आहे. या क्षेत्रावर एकाच पक्षाचे वर्चस्व असल्याने मतदारही, त्या पक्षाचा कोणताही उमेदवार राहो, त्याला प्रथमपसंती देतात.
गोंदिया : गोंदिया तालुक्यातील एकोडी हा जिल्हा परिषद क्षेत्र तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये मोडतो. त्यामुळे या जिल्हा परिषद क्षेत्रातील जनतेला लोकप्रतिनिधीला घेऊन संभ्रम आहे. तिरोडाच्या आमदाराकडे व्यथा मांडावी, की गोंदियाच्या आमदाराकडे समस्या सांगावी, असा प्रश्न नेहमीच उपस्थित होत असतो. त्यामुळे दोन्ही घरचा पाहुणा उपाशीच, अशी या जि. प. क्षेत्राची स्थिती आहे.
एकोडी हा जिल्हा परिषद क्षेत्र गोंदिया व तिरोडा या तालुक्यांच्या मध्य ठिकाणी आहे. असे असले तरी, हे क्षेत्र आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखले जाते. हे क्षेत्र काँग्रेसचा गड आहे. या क्षेत्रात एकदाच भाजपने आपला झेंडा रोवला होता. त्यामुळे या क्षेत्रात इतर पक्ष काँग्रेसच्या तुलनेत प्रभावहीन ठरत असल्याने राजकारणाच्या दृष्टिकोनातून याकडे दुर्लक्ष केले जाते.
क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक क्षेत्र म्हणून एकोडी जिल्हा परिषद क्षेत्र आहे. हे क्षेत्र गोंदिया शहराच्या अवघ्या ५ कि.मी.च्या अंतरापासून सुरू होतेेे. त्यातच शहरापासून ८ ते ९ कि.मी अंतरावर पांगडी पर्यटन क्षेत्रही आहे. जुनेवानी, संग्रामपूर, खर्रा, ओझाटोला व पांगडी ही गावे आदिवासीबहुल म्हणून ओळखली जातात. या क्षेत्रावर एकाच पक्षाचे वर्चस्व असल्याने मतदारही, त्या पक्षाचा कोणताही उमेदवार राहो, त्याला प्रथमपसंती देत असल्याने विकासात कुठे तरी अडचण येत असावी, असा प्रचार इतर पक्षांकडून केला जातो.
एकंदरीत हे क्षेत्र तिरोडा विधानसभा व गोंदिया तालुका या दोन पेचात सापडल्याने लोकप्रतिनिधी या क्षेत्राच्या विकासाला घेऊन अंग काढून घेतात. एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रात एकोडी, दांडेगाव, धामनेवाडा, गंगाझरी, मजीतपूर, सहेसपूर, खडबंदा, टिकायतपूर, जुनेवानी, संग्रामपूर, खर्रा, ओझाटोला, पांगडी या गावांचा समावेश आहे.