जिल्ह्यातून मंत्रिमंडळात वर्णी कुणाची ? चारही आमदार मुंबईला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 03:28 PM2024-11-25T15:28:47+5:302024-11-25T15:31:35+5:30

Gondia Assembly Vidhan Sabha Election 2024 Results : बडोले, रहांगडालेंवर लक्ष, प्रफुल्ल पटेलांची भुमिका महत्वपुर्ण

Whose name is in the cabinet from the district? All four MLAs left for Mumbai | जिल्ह्यातून मंत्रिमंडळात वर्णी कुणाची ? चारही आमदार मुंबईला रवाना

Whose name is in the cabinet from the district? All four MLAs left for Mumbai

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (दि. २३) जाहीर झाला. यात राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले, तर जिल्ह्यातही महायुतीने विजयाचा चौकार मारत महाविकास आघाडीचे पानिपत केले. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यात आता गोंदिया जिल्ह्यातून मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागते, याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या आहेत.


विधानसभा निवडणुकीत महायुतीने घटक पक्षात साधलेले योग्य समन्वय, निवडणुकीदरम्यान प्रचाराचे केलेले सूक्ष्म नियोजन, उमेदवार बदलण्याचा निर्णय, लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळत गोंदिया, आमगाव, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या चारही मतदारसंघांतून महायुतीचे चारही उमेदवार निवडून आणले. तर, प्रथमच काँग्रेसला जिल्ह्यातून भूईसपाट करण्यात महायुतीची खेळी यशस्वी ठरली. निवडून आलेल्या आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. राजकुमार बडोले हे २००९, २०१४ व २०२४ असे तिनदा निवडून आले आहे, तर तिरोडा मतदारसंघाचे आ. विजय रहांगडाले हे सन २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये सलग तिसऱ्यांदा निवडून आले. त्यांनी मतदारसंघात सलग तीनदा निवडून येत विजयाची हॅटट्रीक साधली आहे. तर, गोंदियाचे भाजपचे आ. विनोद अग्रवाल आणि आमगावचे आ. संजय पुराम यांचा हा दुसराच टर्म आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडून आलले अर्जुनी मोरगावचे आ. राजकुमार बडोले यांच्या मागे खा. प्रफुल्ल पटेल यांचे बळ आहे. पटेल यांचा हा गृह जिल्हा असल्याने आणि जिल्ह्यावरील पकड अधिक मजबूत करण्यासाठी बडोले यांना मंत्री करण्यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील यात शंका नाही. त्यामुळे बडोले यांची दुसऱ्यांदा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. गोंदिया भंडारा जिल्ह्यात भाजपचे अनुभवी व सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येणारे विजय रहांगडाले यांची सुद्धा भाजपकडून मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबूकमध्ये असून, सर्वांना सोबत घेऊन चालणारा माणूस, अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील भाजपची पकड मजबूत करण्यासाठी त्यांची भाजपकडून मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असून, जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात तशी चर्चा आहे.


गोंदियाचे आ. विनोद अग्रवाल यांनी ६१ हजार मते घेत गोंदिया विधानसभेच्या इतिहासात प्रथमच कमळ फुलविले आहे. त्यामुळे याचे बक्षीस त्यांना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 


समन्वयातूनच लागणार मंत्रिमंडळात वर्णी 
या निवडणुकीत जिल्ह्यातून भाजपचे ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १, असे चार आमदार महायुतीचे निवडून आले आहेत. त्यात नव्या सरकारचा शपथ विधी सोमवारी (दि. २५) होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातून मंत्रि- मंडळात कोणत्या आमदाराची वर्णी लावायची हे महायुतीत समन्वयाने ठरणार आहे. पण, यात खा. प्रफुल्ल पटेल यांच्या शब्दाला निश्चित वजन असणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी त्यांनी जिल्ह्यात घेतलेली मेहनत ही सर्वासमोर आहे.


चारही आमदार मुंबईला रवाना 
आ. विनोद अग्रवाल, राजकुमार बडोले, विजय रहांगडाले, संजय पुराम हे चारही नवनिर्वाचित आमदार रविवारी (दि. २४) मुंबईला रवाना झाले. या चारही आमदारांना शनिवारी सायंकाळीच पक्ष कार्यालयातून रविवारी मुंबई येथे पोहचण्याचा संदेश आला. त्यामुळे हे चारही आमदार रविवारी सकाळी मुंबईसाठी रवाना झाले.

Web Title: Whose name is in the cabinet from the district? All four MLAs left for Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.