अन्नदात्याची एवढी चेष्टा कशाला करता साहेब?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:30 AM2021-05-08T04:30:33+5:302021-05-08T04:30:33+5:30
सालेकसा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान कापणी सुरू होण्याआधीच शासनाकडून रब्बी पिकाच्या धानाची हमीभावात विक्री करण्यासाठी सातबारा ऑनलाइन झाल्याची ...
सालेकसा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान कापणी सुरू होण्याआधीच शासनाकडून रब्बी पिकाच्या धानाची हमीभावात विक्री करण्यासाठी सातबारा ऑनलाइन झाल्याची प्रक्रिया करण्यात आली आणि तेवढ्याच घाईने ती बंद करण्यात आली. याबाबत दिवसभर शेतात राबणारा शेतकरी अंधारात ठेवला गेला. विहित मुदतीत काही दलाल व्यापाऱ्यांनी आपल्या जवळच्या मोजक्या शेतकऱ्यांचे सातबारा ऑनलाइन करून घेतले. धान उत्पादक शेतकरी हा खरा अन्नदाता असून, त्याची एवढी थट्टा कशाला करता साहेब, अशी आर्त हाक शेतकरी देत आहेत.
देशात सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असून, यादरम्यान राज्य शासनाने राज्यात कडक निर्बंध घातले आहेत. जवळपास सर्वच ठिकाणी कामकाज बंद आहे. लॉकडाऊन काळात केंद्र शासनाकडून गरिबांना दोन महिन्यांचे मोफत धान्य पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या भरवशावर शासनाने हा निर्णय घेतला त्याच शेतकऱ्यांची अवस्था सध्या बिकट आहे. रब्बी हंगामात साधारणत: जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात धानाची पेरणी आणि रोवणी केली गेली. थंडीच्या वेळी गार पाण्यात व चिखलात आपल्याला व आपल्या कुटुंबाला खपवून सतत परिश्रम करून पिकाची लागवड बळीराजाने केली. त्यानंतर रात्री-बेरात्री शेतात जाऊन सतत पिकांना पाणीपुरवठा करण्याचे काम आपली तहान,भूक विसरून केली. त्या रब्बी पिकाची कापणी आता मे महिन्यात होऊ लागली आहे. मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या धान पिकांना योग्य भाव मिळावा म्हणून शेतकरी धान खरेदी केंद्रावर धान घेत आहे. परंतु सातबारा ऑनलाइन प्रक्रिया ३० एप्रिललाच बंद झाली आहे. त्यामुळे गरजेपोटी अल्पदराने धान विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
कोट
शासनाने धान खरेदी केंद्र सुरू करून थेट खरेदी केंद्रावर धान पीक आणि सातबारा स्वीकारावा, ज्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळेल. तसेच खात्यावर रक्कमसुद्धा लवकर देण्याची व्यवस्था करावी.
-देवरम चुटे, युवा शेतकरी, साखरीटोला