मुलींमध्ये वंध्यत्वाची समस्या का वाढली? सहा पैकी एका जोडप्याला वंध्यत्वाची समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 04:44 PM2024-11-28T16:44:04+5:302024-11-28T16:45:22+5:30
स्त्री-पुरुषांमध्येही वंध्यत्वाची समस्या : वंध्यत्वाची आहेत विविध कारणे
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : घरात बाळाच्या हसण्या खिदळण्याचे सुख काही वेगळेच असते व ते सुख प्रत्येकाला हवे असते. वंध्यत्व समस्या स्त्री आणि पुरुष दोघांनाही असू शकतात. महिलेचे वय ३५ पेक्षा कमी आहे आणि एक वर्षाहून अधिक काळ नैसर्गिकरीत्या प्रयत्न करूनही गर्भधारण करू शकत नाही, तेव्हा ते जोडपे 'इनफर्टिलिटी' म्हणजेच वंध्यत्वाच्या समस्येने ग्रस्त असल्याचे म्हटले जाते. स्थूलता, कठोर शारीरिक श्रम, अतिव्यायाम, मादक पदार्थांचा वापर, जास्त मद्यपान, उच्च रक्तदाब आणि इतर यांसारख्या जीवनशैली घटकांमुळे वंध्यत्व येते.
का वाढले वंध्यत्व?
महिलेचे वय ३५ पेक्षा जास्त असेल आणि ६ महिन्यांहून अधिक काळ प्रयत्न करूनही मूल होऊ शकत नसेल, तर ही वंध्यत्व स्थिती असते. भारतात दर सहा पैकी एका जोडप्याला वंध्यत्वाची समस्या आहे.
वंध्यत्वाची कारणे
अधिक वय, शुक्राणूंचे विकार, स्त्रीबीजांची संख्या कमी असणे, अंडकोषाच्या आजूबाजूच्या नसा सुजतात, ब्लॉक्ड किंवा डॅमेज फेलोपियन ट्यूज शुक्राणूंना शरीरातून बाहेर पडणे अशक्य होते. ओवुलेशन समस्या वीर्य बाहेर येण्याऐवजी परत ब्लैडरमध्ये जाते. हार्मोनल इम्बॅलन्स, सिगारेट आणि अल्कोहोल सेवन, पिट्युटरी ट्युमर, लठ्ठपणा, वजन कमी असणे, एन्डोमेट्रिओसिस (गर्भाशयातील अस्तराची समस्या), तीव्र ताण, फायब्रॉइड्स किंवा पॉलीप्स (गर्भाशयात गाठी), लो स्पर्म काउंट ही कारणे आहेत.
काय काळजी घ्यायला हवी?
वय २० ते ३५ वयोगटात असेल तर नैसर्गिकरीत्या एक वर्षासाठी गर्भधारणा करण्याचा सल्ला दिला जातो. तुमचे किंवा तुमच्या जोडीदाराचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असेल आणि ६ महिने नैसर्गिकरीत्या गर्भधारणेचा प्रयत्न करूनही गर्भधारणा होऊ शकत नसेल, तर शक्य तितक्या लवकर योग्य फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अनियमित मासिक पाळी, मेनोपॉजची स्थिती, मिसकॅरेंजेससारख्या समस्या किंवा पुरुषांमध्ये इरेक्शन- सारख्या इतर समस्या असतील, तर तत्काळ डॉक्टरचा सल्ला घ्यावा.
रोज किमान एक रुग्ण
येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात वंध्यत्वाला घेऊन दररोज एक रुग्ण येत असतो. महिलांचे वंध्यत्व आधी तपासल्यानंतर तिच्या अहवालानंतर पुरुषांचीही तपासणी करतात. काहींची तपासणी सोबत केली जाते.
"दाम्पत्यांची सामान्य शारीरिक तपासणी करून त्यांची मेडिकल हिस्टरी घेतली जाते. ज्यामध्ये आनुवंशिकता, पूर्वी घेतलेले फर्टिलिटी उपचार, दुर्धर आजारांचे उपचार, प्रजनन अवयवांची सर्जरी, मिसकॅरेजेस, इन्फेक्शन्स, हार्मोनल समस्या, व्यसने, आहाराच्या सवयी अशी बरीच माहिती घेतली जाते."
- ऋतू जैन, स्त्रीरोगतज्ज्ञ गोंदिया.