संकट काळात निराधारांना काेण देणार आधार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:37 AM2021-04-30T04:37:28+5:302021-04-30T04:37:28+5:30
नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, इंदिरा गांधी ...
नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना आदी विविध योजनेचे लाभार्थी मागील वर्षभरापासून अनुदानापासून वंचित आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोविड संकट काळात निराधारांना आधार कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यातील हजारो विविध योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा मिळणारे एक हजार रुपयाचे अनुदान त्वरित देण्यात यावे. अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते रेवचंद शहारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सहा एप्रिल रोजी तहसील कार्यालयाला निवेदन देऊनही अद्याप लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. तर दुसरीकडे येथील १०८ लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यांचे नाव यादीतून रद्द झाले आहे. त्यांनी पुन्हा नव्याने अर्ज भरावे. त्यामुळे पुन्हा नव्याने फार्म भरण्याचे संकट लाभार्थ्यांवर ओढवले आहे. कोरोना महामारीच्या काळात आम्ही कसे जगावे? असा संतप्त सवाल संजय गांधी निराधार योजनेतील वृद्ध, अपंग,विधवा, निराधार लाभार्थ्यांनी केला आहे. सत्यापणासाठी मागील वर्षी नियमित लाभार्थ्यांचे आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, ह्यात असल्याचा दाखला आधी कागदपत्रे मागविण्यात आली होती. लाभार्थ्यांनी त्या कागदपत्राची पूर्तता देखील तहसील कार्यालयाला केली. परंतु त्यांचे मानधन मात्र अडलेच आहे. ज्या लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयांकडून कागदपत्रे मागवली होती. त्याची पूर्तता करून देखील त्यांचे अनुदान गेल्या वर्षभरापासून थांबले आले आहे. या लाभार्थ्यांचे अनुदान तहसील कार्यालयामार्फत मार्चअखेर शासनाला परत पाठविण्यात आले आहे. असे उत्तर तहसील कार्यालयाकडून दिले जात आहे.
.......
औषाधोपचारासाठी पैसे आणायचे कुठून
सध्या विविध आजाराच्या संसर्गाची साथ आहे. सर्दी, खोकला, ताप या संसर्गाने वृद्ध अपंग विधवा या साथीत संसर्गित आहेत आता वैद्यकीय उपचारासाठी, औषध पाण्यासाठी व उदरनिर्वाहासाठी पैसे कुठून आणायचे? असा प्रश्न आर्थिक अनुदानापासून वंचित असलेले लाभार्थ्यांना पुढे उभा ठाकला आहे. गेल्या वर्षभरापासून या महिन्यात येईल, पुढच्या महिन्यात येईल या आशेवर सध्या लाभार्थी जगत आहेत या महिन्यात अनुदान खात्यावर जमा झाला काय? याची शहानिशा करणाऱ्यांसाठी वृद्ध, अपंग, विधवा, निराधार, लाभार्थी बँकांच्या ग्राहक सेवा केंद्रांवर व बँकेत दर महिन्याला तर काही दर आठवड्याला आपल्या टाचा झिजवत आहेत.
........
३१ मार्चपर्यंत सदर लाभार्थी ह्यात असल्याचे प्रमाणपत्र,आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स लाभार्थ्यांना मागवली गेली. परंतु काही लाभार्थ्यांनी त्या कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे सिस्टीममध्ये त्यांची नावे वगळली आहेत. त्यामुळे त्यांचे अनुदान थांबले आहे. लाभार्थ्यांची नावे पुन्हा यादीत घेण्यासाठी लाभार्थ्यांचे अर्ज पुन्हा भरून घेण्यासाठी, तालुक्यातील सर्व तलाठ्यांना निर्देश दिले आहेत.
- विनोद मेश्राम,
तहसीलदार, अर्जुनी मोरगाव.