कंपन्यांचे पोट भरण्यासाठी पीक विमा काढायचा का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:26 AM2021-08-01T04:26:25+5:302021-08-01T04:26:25+5:30
गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मात्र, यानंतरही ...
गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मात्र, यानंतरही पीक विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. परिणामी, यंदा पीक विमा काढण्यासाठी मुदतवाढ देऊनसुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याकडे पाठ फिरविली आहे. मागील वर्षी ५६६४० शेतकऱ्यांनी पीक काढला होता तर यंदा केवळ १२०६८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यामुळे पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या निम्म्यावर आली असून केवळ विमा कंपन्यांचे पोट भरण्यासाठी पीक विमा काढायचा का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
.........
यंदा केवळ २१.३० टक्के पीक विमा
- मागील वर्षी अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान होऊनदेखील पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना परतावा मिळाला नाही. त्यामुळे यंदा केवळ २१.३० टक्के म्हणजे १२०६८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला.
- पीक विमा कंपन्यांकडून नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण केले जात नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहतो.
- इतर पिकांच्या तुलनेत धान पिकाच्या नुकसान भरपाईसाठी वेगळे निकष लावले जात आहेत. त्यामुळे परतावा मिळण्यास अडचण होत आहे.
........
कोट
गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र आहे. तर धान पिकाच्या नुकसानीसाठी विमा कंपन्याकडून वेगळे निकष लावले जात आहेत. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यास वंचित राहत आहेत. त्यामुळेच यंदा विमा कंपन्यांना नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.
- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
......
जिल्ह्यातील एकूण शेतकरी : २ लाख ७२ हजार,
मागील वर्षी पीक विमा काढलेले शेतकरी : ५६६४०
यावर्षी पीक विमा काढलेले शेतकरी : १२०६८
एकूण खरीप क्षेत्र : २ लाख १० हजार २४२
......................................
तालुकानिहाय पीक विमा काढणारे शेतकरी
आमगाव : ६३३
अर्जुनी मोरगाव : ६३३
देवरी : ९३१
गोंदिया :१५६३
गोरेगाव : १४३७
सडक अर्जुनी : २८२१
सालेकसा : ७४८
तिरोडा : ३२७२
..............................
पीकनिहाय लागवड क्षेत्र
धान : १ लाख ८१ हजार हेक्टर
तूर : ४ हजार हेक्टर
ऊस : १५ हजार हेक्टर
इतर पिके : १० हजार हेक्टर
.................
यामुळेच फिरविली पाठ
जिल्ह्यात एकूण २ लाख ७२ हजार खातेधारक शेतकरी आहेत. यापैकी मागील वर्षी ५६६४० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. विमा हप्त्यापोटी शेतकरी, राज्य आणि केंद्र सरकार यांनी एकूण १६ कोटी रुपये भरले होते. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात पूरपरिस्थिती निर्माण हाेऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र, विमा कंपनीने केवळ ४३३३ शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरवीत २ कोटी रुपये नुकसान भरपाई दिली. नुकसान हाेऊनदेखील लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याकडे पाठ फिरविली आहे.
............
मागील वर्षीचा अनुभव वाईट
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याचा परतावा मिळावा यासाठी पीक विमा काढला होता. मात्र, मागील वर्षी नुकसान होऊनसुद्धा परतावा मिळाला नाही. त्यामुळे यंदा पीक विमा काढलाच नाही.
- रामदास बोरकर, शेतकरी, नवेगावबांध
............
पीक विमा कंपन्याकडून दरवर्षी शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. मागील वर्षी पूर आणि अतिवृष्टी हाेऊनसुद्धा विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे आता पीक विमा न काढण्याचा निर्णय घेतला आहे.
- देवीदास जमाईवार, शेतकरी
.........