बंदीनंतरही दुकानदारांकडून प्लास्टिकचा सर्रास वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:33 AM2021-05-25T04:33:16+5:302021-05-25T04:33:16+5:30
गोंदिया : राज्यात खेड्यापासून, तर शहरापर्यंत गल्लोगल्ली प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी पर्यावरण प्रदूषित होत असल्याने ...
गोंदिया : राज्यात खेड्यापासून, तर शहरापर्यंत गल्लोगल्ली प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी पर्यावरण प्रदूषित होत असल्याने मानवी शरीरावर अपाय होत आहेत. प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीचा फज्जा उडाल्याचे यावरून दिसून येत आहे. प्रदूषणात होणारी वाढ थांबविण्याकरिता प्लास्टिक पिशव्या बंद करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. त्यानुसार ५० मायक्रॉन्सपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही किरकोळ व्यापारी, साहित्य साठवणूक करणारे होलसेल विक्रेते प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करीत आहेत.
प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांना दंड व सक्तमजुरीची तरतूदही शासनाने कायद्यात केली आहे. हा आदेश नुकताच राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने निर्गमित केला. पर्यावरणमंत्र्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. शासन आदेश काढून प्लास्टिक पिशविला बंदी घातली. मात्र ही बंदी हवेतच विरल्यासारखी दिसून येत आहे. दुकानदार या आदेशाचे उल्लंघन करून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास करीतच आहे. किरकोळ व होलसेल विक्रेत्यांकडून त्याचा वापर सुरूच आहे. या पिशव्या तुंबल्या जात असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. कमी जाडीच्या पिशव्यांची परप्रांतातून राज्यात मोठ्या प्रमाणात आयात होत आहे. त्यावर जिल्हा प्रशासनाचे अंकुश नसल्याने पर्यावरण विभाग व पर्यावरणमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात आहे.
शासन आदेश पायदळी तुडविले जात आहे. विक्रेते व व्यापारी मोठ्या प्रमाणात अद्याप प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. नागरिकही हक्काने त्यांना प्लास्टिक पिशव्या मागत असतात. त्यामुळे प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे. मात्र संबंधितांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि दुकानदारांचे साटेलोटे तर नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे. प्रशासनाने ५० मायक्रॉन्सपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
---------------------------
आता कारवाया शून्य
नगर परिषदेने मध्यंतरी प्लास्टिक बंदीवर अंमलबजावणी करण्यासाठी विशेष पथक तयार केले होते. या पथकांनी चांगली कामगिरी करून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांची जप्ती तसेच वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाया केल्या होत्या. मात्र कोरोना काळ सुरू झाल्यापासून प्लास्टिक बंद विरोधी कारवाया बंद पडल्या आहेत. परिणामी व्यापारी पुन्हा प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करीत आहेत.