पाच स्रोतांतून विधवा ‘मालता’च्या कुटुंबाला मिळाली आर्थिक बळकटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 10:37 PM2018-01-05T22:37:36+5:302018-01-05T22:37:48+5:30
पतीच्या निधनानंतर आपल्या तिन्ही मुलांचे शिक्षण व भविष्य कसे होईल, याच चिंतेत नेहमी असणाऱ्या सालेकसा तालुक्याच्या लोहारा येथील मालता माणिकलाल कटरे यांनी बचत गटाच्या माध्यमातून कमाईचे पाच स्रोत निर्माण केले व आपल्या संकटांवर हमखासपणे मात दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पतीच्या निधनानंतर आपल्या तिन्ही मुलांचे शिक्षण व भविष्य कसे होईल, याच चिंतेत नेहमी असणाºया सालेकसा तालुक्याच्या लोहारा येथील मालता माणिकलाल कटरे यांनी बचत गटाच्या माध्यमातून कमाईचे पाच स्रोत निर्माण केले व आपल्या संकटांवर हमखासपणे मात दिली. मुलांना शिक्षण देऊन त्यांच्यासाठी व्यवसाय उभारून आज त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत.
पतीच्या निधनांनतर कुटुंबाच्या भवितव्याच्या चिंतेत असतानाच मालता यांच्याकडे सीआरपी आल्या व गटाबद्दल सगळी माहिती सांगितली. तेव्हा त्यांना गटाचे महत्व समजले. त्यांनी मोहल्ल्यातील महिलांना विचारून सीआरपीकडून गटाचे महत्व त्यांना पटवून दिले. नंतर १४ महिलांनी मिळू एक गट तयार केला. गटाचे नाव लहरी स्वयंसहायता महिला बचत गट असे ठेवण्यात आले. गटातील महिलांनी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली.
आधी या गटाची मासिक बचत ५० रूपये होती. ती वाढवून १०० रूपये करण्यात आली. दरम्यान मालता यांना मुलांचे शिक्षण व भविष्याचे विचार भेळसावत होते. अशात सर्वात मोठा आधार त्यांना बचत गटामुळे मिळाला. त्या एक हजार रूपये महिन्याने शाळेत खिचडी बनविण्याचे काम व शेतीसुद्धा करीत होत्या.
दरम्यान गटाला १५ हजारांचा फिरता निधी (आरएफ) मिळाला. त्यामधून त्यांनी १० हजार रूपयांचे कर्ज घेवून मनिहारी व्यवसाय सुरू केला.
शाळेत खिचडी बनवित असल्यामुळे शनिवार व रविवार गावामध्ये फिरून त्या मनिहारी व्यवसाय करू लागल्या. गावात सर्वांना माहीत असल्यामुळे त्यांच्या घरूनही वस्तू विक्री होत होत्या. पण एवढ्यात घर खर्च व मुलांच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण होत नव्हता.
त्यामुळे त्यांनी ग्रामसंस्थेतून सीआयएफचे ५० हजार रूपये कर्ज घेतले व मोठ्या मुलाच्या व्यवसायाला हातभार लावला.
यानंतर आयसीआयसीआय बँकेकडून गटाला एक लाख रूपयांचे कर्ज मिळाले. मनिहारी व्यवसायासाठी भांडवल कमी पडत असल्यामुळे त्या रकमेची त्यात गुंतवणूक करून व्यवसाय सुरू केले. त्यानंतर गटाला पुन्हा एक लाख ९८ हजार रूपयांचे कर्ज मिळाले. त्यातून त्यांनी एक लाख रूपयांचे कर्ज घेतले.
दरम्यान उन्हाळा सुरू झाल्याने आपल्या दोन मुलांच्या व्यवसायासाठी घोडी विकत घेतली. ही घोडी आॅर्डरप्रमाणे लग्नात नेण्यात येत होती. त्यातून त्यांना ५० हजार रूपयांचा नफा मिळाला. ८ मार्च २०१७ रोजी सहारा लोकसंचालित साधन केंद्राद्वारे महिला जागतिक दिनाला त्यांची घोडी बोलाविण्यात आली होती. आता मालता यांच्याकडे खिचडी, मनिहारी, मोठ्या मुलाची कमाई, घोडी व शेती असे कमाईचे पाच स्त्रोत आहेत. गटात आल्यामुळेच मुलांचे शिक्षण व त्यांच्यासाठी व्यवसाय त्या उभारू शकल्या. त्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकल्या.
मुलांनाही केले आत्मनिर्भर
सालेकसा तालुक्यातील लोहारा गावात एकूण २० बचत गट आहेत. यापैकी लहरी बचत गटात एकूण २० महिला असून ६ मे २०१४ रोजी स्थापना झाली. याच गटाचे अध्यक्ष मालता आहेत. त्यांना तीन मुले असून मोठा मुलगा नागपूर येथे सेंट्रिंग मिस्त्री काम करतो. भाड्याच्या खोलीमध्ये राहत असल्यामुळे त्याला ते परवडत नव्हते. त्यामुळे मालता यांनी ग्रामसंस्थेतून सीआयएफचे ५० हजार रूपये कर्ज घेतले व स्वत:जवळचे ५० हजार रूपये गोळा करून मुलाला नागपूरबाहेर प्लॉट खरेदी करून दिला. तसेच त्या कर्जाची परतफेड करून दुसºया कर्जातून इतर दोन मुलांसाठी घोडी खरेदी करून दिली. लग्न समारंभात व इतर कार्यक्रमात आॅर्डरनुसार घोडी नेऊन अर्थार्जन करीत आहे. मालता पतीच्या निधनाने खचून न जाता आत्मविश्वास व गटाच्या माध्यतून मुलांनाही आत्मनिर्भर करून एक आदर्श निर्माण केला आहे.