उड्डाणपुलावर लावले रुंदी कठडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:30 PM2018-10-01T21:30:25+5:302018-10-01T21:30:58+5:30
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरक्षीत नसल्याचा अहवाल रेल्वे विभागाने दिला. तसेच पुलावर उंची व रुंदी कठडे लावण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. मात्र तीन महिन्याचा कालावधी लोटून पुलावरुन रुंदी कठडे लावण्यात आले नव्हते. परिणामी पुलावरुन चारचाकी वाहने सर्रासपणे धावत होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरुन रुंदी कठडे लावून केवळ दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना या पुलावर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरक्षीत नसल्याचा अहवाल रेल्वे विभागाने दिला. तसेच पुलावर उंची व रुंदी कठडे लावण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. मात्र तीन महिन्याचा कालावधी लोटून पुलावरुन रुंदी कठडे लावण्यात आले नव्हते. परिणामी पुलावरुन चारचाकी वाहने सर्रासपणे धावत होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरुन रुंदी कठडे लावून केवळ दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना या पुलावर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
जुना उड्डाणपुलाच्या बांधकामाला बरीच वर्षे झाली आहे. त्यामुळे हा पूल जीर्ण झाला असून पुलाच्या मध्यभागी मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे या पुलावरुन जड इतर वाहनांची वाहतूक सुरू ठेवल्यास पूल केव्हाही कोसळण्याची शक्यता रेल्वे विभागाने वर्तविली होती. यासंबंधीचे पत्र सुध्दा जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी याची दखल घेत या पुलावर उंची कठडे लावून व जडवाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.
उंची कठडे लावतानाच रुंदी कठडे सुध्दा लावण्याचे निर्देश होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते. परिणामी मागील तीन महिन्यापासून या पुलावरुन जड वाहने वगळता इतर सर्वच वाहने धावत होती. त्यामुळे अपघात आणि पुलाचा भाग कोसळण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर जिल्हाधिकारी बलकवडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाला पत्र देत त्वरीत उपाय योजना करण्याचे निर्देश दिले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही पुलावर रुंदी कठडे लावून दुचाकी व तीन चाकी वाहने वगळता इतर वाहनाना प्रवेश बंदी का केली नाही असा खुलासा मागतिल्याची माहिती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची त्वरीत दखल घेत पुलाच्या दोन्ही बाजुला रुंदी कठडे लावले. तसेच दुचाकी आणि तीन चाकी वाहने वगळता सर्वच वाहनांना जुन्या उड्डाणपुलावर प्रवेश बंदी लागू केली आहे.
पूल पाडण्यासाठी एजन्सीचा शोध
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण झालेला उड्डाणपूल पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासन एजन्सीचा मागील दोन महिन्यापासून शोध घेत आहे. मात्र अद्यापही शोध पूर्ण झाला नसल्याची माहिती आहे.
पुलाची डागडूजी नाही
जुन्या उड्डाणपुलावर काही ठिकाणी खड्डे पडले आहे. तसेच काही भाग जीर्ण झाला असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत या पुलावरून दुचाकी व तीन चाकी वाहनांना प्रवेश दिला जात आहे. मात्र या पुलाची डागडूजी करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. पण, या विभागाने अद्यापही कामाला सुरूवात केलेली नाही.
नवीन उड्डाणपुलावर साचते पाणी
जुन्या उड्डाणपुलाची समस्या लक्षात घेत प्रशासनाने गोंदिया-बालाघाट मार्गावर नवीन उड्डाणपूल तयार केला. मात्र हा पूल सुध्दा सदोष असून या पुलाचा उतार चुकीचा तर दोन्ही बाजुला पादचारी पूल तयार केलेला नाही.पावसाळ्यात पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. त्यामुळे हा पूल देखील वाहतुकीस सुरक्षीत नाही.