रानटी हत्ती पुन्हा परतले, पिकांचे नुकसान; गावकऱ्यांना रात्री घराबाहेर न पडण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2022 04:27 PM2022-11-12T16:27:41+5:302022-11-12T16:32:32+5:30

हत्तींचा कळप देवरी तालुक्याच्या दिशेने, चिमणटोल्यात पिकांचे नुकसान; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Wild elephants return to Gondia district, damage crops; Instructions to the villagers not to go out at night | रानटी हत्ती पुन्हा परतले, पिकांचे नुकसान; गावकऱ्यांना रात्री घराबाहेर न पडण्याच्या सूचना

रानटी हत्ती पुन्हा परतले, पिकांचे नुकसान; गावकऱ्यांना रात्री घराबाहेर न पडण्याच्या सूचना

Next

चिचगड (गोंदिया) : गडचिरोली जिल्ह्यात परत गेलेल्या हत्तींच्या कळपाने जिल्ह्यात पुन्हा एन्ट्री केली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली परिसरात हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात धानपिकांचे नुकसान केले. त्यानंतर या कळपाने आता देवरी तालुक्याच्या दिशेने मोर्चा वळविला असून चिचगड पासून २० किमी अंतरावर असलेल्या चिमणटोला गावात गुरुवारी (दि. ९) रात्री प्रवेश करून कापणी करून ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

प्राप्त माहितीनुसार चिचगड वन परिक्षेत्रापासून २० किमी अंतरावरील चिमणटोला परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास जंगली हत्तींच्या कळपाने प्रवेश केला. तसेच या परिसरातील शेतामध्ये रचून ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. हत्तींचा कळप गावाच्या सीमेपासून २०० ते ३०० फूट अंतरावर येऊन काही वेळ थांबल्यानंतर परत जंगलाच्या दिशेने निघून गेले. पण ते कधी पुन्हा येणार याची काही शाश्वती नाही.

या घटनेची माहिती मिळताच चिचगड वनपरिक्षेत्राधिकारी संगीता ढोबळे यांनी चिमणटोला गावाला आपल्या चमूसह भेट दिली. तसेच नुकसानीचे पंचनामे करून गावकऱ्यांना रात्रीच्या वेळेस घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. बुधवारी हत्तीच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी, गोठणगाव, उमरपायली व नागणडोह परिसरात हजेरी लावली होती. उमरपायली येथील शेतातील धानपिकांचे नुकसान करून हा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात परत गेला होता. पण गुरुवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा याच परिसरात हजेरी लावली.

वनविभागाची चमू चिचगड परिसरात दाखल

जंगली हत्तीच्या कळपाने चिचगड, चिमणटोला परिसरात एन्ट्री केली. या परिसरातील धानपिकांचे नुकसान केले. त्यामुळे वनविभागाचे चमू या हत्तीच्या कळपावर नजर ठेवण्यासाठी या परिसरात दाखल झाले आहे. गावकऱ्यांनी मोहाफुले वाळू घालू नये तसेच हत्तींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये अशा सूचना गावकऱ्यांना केल्या आहेत.

Web Title: Wild elephants return to Gondia district, damage crops; Instructions to the villagers not to go out at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.