केटीएसच्या भिंतीवर वन्यजीव दर्शन
By admin | Published: January 11, 2016 01:44 AM2016-01-11T01:44:04+5:302016-01-11T01:44:04+5:30
सारस फेस्टिव्हल अंतर्गत रविवारी (दि.१०) विद्यार्थ्यांची वॉल पेंटिंग स्पर्धा घेण्यात आली.
चित्रकला स्पर्धेला भरघोस प्रतिसाद : पालकमंत्र्यांनी दिली भेट
गोंदिया : सारस फेस्टिव्हल अंतर्गत रविवारी (दि.१०) विद्यार्थ्यांची वॉल पेंटिंग स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेंत भाग घेतलेल्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या सुरक्षा भिंतीवर चित्रकलेच्या माध्यमातून आपली कलाकृती साकारली. या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाल्याने केटीएस रूग्णालयाच्या भिंतीवरच आता वन्यजीव दर्शन होत आहे.
जिल्हा पर्यटन समितीच्यावतीने सारस फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. १५ डिसेंबरपासून सुरू असलेल्या व ३१ जानेवारीपर्यंत आयोजीत या सारस फेस्टीवल अंतर्गत विविध कार्यक्र म घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी (दि.१०) येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या सुरक्षा भिंतीवर वॉल पेंटिंग स्पर्धा घेण्यात आली.
राज्यात फक्त गोंदिया जिल्ह्यात आढळणारा सारस हा पक्षी सर्वांच्या ओळखीचा व्हावा. तसेच चित्रकलेच्या माध्यमातून साकारण्यात आलेले पक्षी, वन्यजीव व निसर्गाचे देखावे यातून सामान्य माणसात निसर्गाच्या या वरदानाप्रती संवेदनशीलता निर्माण व्हावी हा या स्पर्धेमागचा हेतू होता.
याकरिताच सारस, निसर्ग व वन्यजीव या थीमवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. विशेष म्हणजे स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. तर स्पर्धेंतर्गत स्थळी जाऊन पाहणी केली असता चिमुकले विद्यार्थी एकाग्र चित्ताने भिंतीवर ब्रश चालवून आपली कलाकृती त्यात ओतण्याचा प्रयत्न करतानाही बघावयास मिळाले.
स्पर्धेसाठी पक्षिमित्र रूपेश निंबार्ते, दुष्यंत आकरे, मुकुंद धुर्वे, अभिजीत परिहार, राजकुमार खोडेचा, सावन बहेकार, राजेश तिवारी, डॉ. राजेंद्र जैन, रवी गोलानी, विजय ताटे, शशांक लाडेकर यांच्यासह अन्य पक्षी व वन्यजीव प्रेमींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)