वन्यजीव सप्ताह कागदावरच!
By admin | Published: October 9, 2015 02:10 AM2015-10-09T02:10:21+5:302015-10-09T02:10:21+5:30
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र कार्यालयाच्या वतीने आयोजित वन्यजीव सप्ताह केवळ कागदापुरता मर्यादित राहिला आहे.
व्याघ्र प्रकल्प : सात दिवसांच्या कार्यक्रमांसाठी फक्त २५ हजार रूपये
देवानंद शहारे गोंदिया
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र कार्यालयाच्या वतीने आयोजित वन्यजीव सप्ताह केवळ कागदापुरता मर्यादित राहिला आहे. १ ते ७ आॅक्टोबरदरम्यान राबविलेल्या वन्यजीन सप्ताहांतर्गत कार्यक्रम घेतल्याचा दावा अधिकाऱ्यांद्वारे करण्यात आला असला तरी सात दिवसात जेमतेम तीन कार्यक्रम घेतले. त्यातही दुसऱ्यांची मदत घेण्यात आली. मात्र वन्यजीव विभागाकडून कोणत्याही कार्यक्रमाचे साधे वृत्त प्रकाशित करण्यातही स्वारस्य दाखविण्यात आले नाही. त्यामुळे आपल्या कार्यक्रमातून जनजागृती करण्याआधी या विभागाच्या अधिकाऱ्यांमध्येच जागृती आणणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव अभयारण्य, नागझिरा अभयारण्य, न्यू नागझिरा अभयारण्य व कोका अभयारण्याचा समावेश आहे. वन्यजीव क्षेत्र व वन्यजीवांच्या दृष्टीने जिल्हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतानाही वन्यजीव सप्ताहासाठी विभागाला केवळ २५ हजार रूपये देण्यात आले.
वन्यजीव विभागाद्वारे १ ते ७ आॅक्टोबरपर्यंत आयोजित वन्यजीव सप्ताहांतर्गत नागरिकांना वनांचे महत्त्व, वन्यजीव स्थळांच्या संवर्धनाच्या संकल्पनेला व्यापकता देणे, सर्वसामान्य नागरिकांना विशेष करून युवा पिढीमध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती व वन्यजीवांबाबत दयाभाव निर्माण करणे, वन्यजीव सुरक्षा व संवर्धनाच्या संदर्भात समाजाच्या सर्व घटकांपर्यंत जनजागृतीसाठी जिल्हास्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे होते. कार्यक्रमांमध्ये शासकीय विभाग व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग अपेक्षित होता. तो त्यांनी आपापल्या परीने दिला. मात्र यात वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रचार- प्रसिद्धी केली असती तर अजून चांगला प्रतिसाद मिळाला असता.
केवळ तीन दिवस कार्यक्रम
वन्यजीव सप्ताहात स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून तीन दिवसीय कार्यक्रमांच्या आयोजनाचा दावा विभागाद्वारे करण्यात आला आहे. यात १ आॅक्टोबर रोजी मानव व वन्यजीव संघर्ष या विषयावर कन्हारटोली येथील भवभूती मंदिरात प्रश्नमंजुषा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. २ आॅक्टोबर रोजी मानवाच्या मदतीत जैवविविधतेचे महत्त्व, पर्यावरण व वन्यजीव विषयावर जिल्हा सामान्य रूग्णालयात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. याशिवाय ३ आॅक्टोबर रोजी जैवविविधतेचे महत्त्व, मानव व वन्यजीव संघर्ष या विषयावर सुभाष बगिचा येथे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. मात्र या कार्यक्रमातही स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार होता. वनाधिकाऱ्यांनी त्याकडे पाठच फिरविली.
विभागात १७ पदे रिक्तच
वन्यजीव क्षेत्राच्या दृष्टीने विदर्भात गोंदिया जिल्हा पुढे असतानाही रिक्त पदांची संख्या अधिक आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालकाचे महत्त्वपूर्ण पद रिक्त आहे. सहायक वनसंरक्षकाचे दोन पदे रिक्त आहेत. याशिवाय वनपाल, वनरक्षक, सर्वेक्षक, लेखापाल, लिपिक, महावत, चौकीदार आदींचे १७ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचा प्रभाव वन्यजीव विभागाच्या कामकाजावरही पडत आहे.