भाजप जिल्हाध्यक्षाची निवड उद्या होणार बहुजन चेहरा? : शर्यतीत पाच नावे
By admin | Published: January 16, 2016 02:16 AM2016-01-16T02:16:26+5:302016-01-16T02:16:26+5:30
भारतीय जनता पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे नवीन जिल्हाध्यक्षाची निवड केली जात आहे.
गोंदिया : भारतीय जनता पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे नवीन जिल्हाध्यक्षाची निवड केली जात आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या, तसेच जिल्हा परिषदेतही सत्तेचा भागीदार असलेल्या भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी आपली वर्णी लागावी यासाठी काही जुने नेते प्रयत्नशील आहेत. त्यात चार ते पाच नावे चर्चेत आहेत. मात्र त्यापैकी कोणाला संधी मिळणार की अग्रवाल जिल्हाध्यक्षपदी कायम राहणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
येत्या रविवारी (दि.१७) भाजपच्या जिल्हाध्यक्षाची निवड होणार आहे. त्यासाठी माजी आमदार आणि तीन वर्षापूर्वी जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे हेमंत पटले, गोंदियाचे माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, आमगावचे माजी आमदार केशव मानकर, भाजपचे निष्ठावान येसुलाल उपराडे, माजी आमदार भैरसिंग नागपुरे यासोबतच माजी आ.डॉ.खुशाल बोपचे यांचेही नाव चर्चेत आहे. पण अध्यक्षपदासाठी कोणते नाव निश्चित होणार हे रविवारी नागपुरात ठरणार आहे.
विद्यमान अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाले होते. मात्र जिल्हा परिषदेतील मताधिक्य कमी झाले. असे असले तरी त्यांची सर्वसमावेशक कामगिरी आणि क्षमता पक्षासाठी फायद्याची ठरली आहे. मात्र यावेळी जिल्हाध्यक्षपदासाठी बहुजन चेहरा देण्याचे पक्षाने निश्चित केल्याचे कळते. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्याची वर्णी लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)