आगामी निवडणुका महायुतीत घड्याळ चिन्हावरच लढवू - सुनील तटकरे
By अंकुश गुंडावार | Published: November 6, 2023 04:59 PM2023-11-06T16:59:43+5:302023-11-06T17:01:13+5:30
मराठाला समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे
गोंदिया : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खा. शरद पवार गट आणि ना. अजित पवार असे दोन गट पडले. तर राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणाची, याचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. पण, एकूण कायदेविषयक बाबी आणि सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेसंदर्भात दिलेल्या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची बाजू ही प्रबळ आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुका या आम्ही महायुतीत घड्याळ चिन्हावरच लढवू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी (दि. ६) गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रविवारपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी ते गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. घड्याळ तेच पण वेळ नवीन या स्लाेगन अंतर्गत संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहे. पत्रकार परिषदेला पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी आ. राजेंद्र जैन उपस्थित होते.
सुनील तटकरे म्हणाले, २०१४च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच खा. प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे २ जुलैला महायुती सरकारला दिलेला पाठिंबा हा कुण्याही यंत्रणेच्या भीतीपोटी नव्हे, तर महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी दिला, असे तटकरे यांनी सांगितले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती नेतृत्व देण्याचे काम जनतेने केले, त्याबद्दल त्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले.
बारामतीतील ग्रामपंचायतीच्या १२ पैकी १२ जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने जिंकल्या आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीत बारामतीची जनता काय करणार आहे, याचे उत्तर जनतेने आजच्या निकालातून दिल्याचे त्यांनी सांगितले. खा. प्रफुल्ल पटेल यांचा अनेक वर्षांचा अनुभव आणि अजित पवार नावाचे असलेले ग्लॅमर याचा फायदा आम्हाला झाला आहे. त्यामुळेच ४३ आमदार दादांच्या पाठीशी उभे राहिले, शिवाय नागालँडमधील आमदारांनीही पाठिंबा दिला आहे. आता केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही तटकरे यांनी सांगितले.
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे
कुणबी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकले नव्हते. त्यामुळे मराठा समाजाला कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी कायद्याच्या सर्व बाजू तपासल्या जात आहेत. त्यामुळे या प्रक्रियेस थोडा विलंब होत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीत टिकणारे आरक्षण मिळावे, हीच महायुती सरकारची भूमिका असल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील जनता भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देते
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वात आम्ही महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याने आमच्यावर विविध आरोप केले जात आहेत. पण, या सर्व आरोपांचे उत्तर २०२४च्या निकालानंतर मिळेल. निवडणुकीत जनता नेहमीच भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देत असल्याचे खा. सुनील तटकरे यांनी सांगितले.