अनुदानित बियाणे मला मिळणार का रे भाऊ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:30 AM2021-05-27T04:30:46+5:302021-05-27T04:30:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : खरीप हंगाम तोंडावर असून, शेतकरी खते, बियाण्यांची जुळवाजुळव करण्याच्या कामात व्यस्त आहेत. कृषी विभागाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : खरीप हंगाम तोंडावर असून, शेतकरी खते, बियाण्यांची जुळवाजुळव करण्याच्या कामात व्यस्त आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टल सुरु केले असून, त्यावर बियाण्यांसह यंत्रसामुग्री, कृषिविषयक साहित्य तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली जाते. यापूर्वी शेतकऱ्यांना ‘महाबीज’च्या माध्यमातून अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन दिले जात होते. मात्र, यावर्षीपासून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागवून त्यांना महाबीजच्या बियाणे विक्रेत्यांकडून अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन दिले जात आहे. तसेच अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली जाणार आहे. अनुदानित बियाण्यांसाठी जिल्ह्यातील दीड हजारांवर शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केले आहेत. या शेतकऱ्यांना अनुदानावरील बियाण्यांसाठी त्यांनी केलेले अर्ज पात्र ठरल्याचा संदेश (एसएमएस) पाठवला जाणार आहे. एसएमएस आलेल्या शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यात पीक प्रात्यक्षिकासाठी शंभर टक्के तर प्रमाणित बियाणे प्रतिक्विंटल अनुदानावर उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
...............
जिल्ह्यातून २५ हजारांवर अर्ज
- महाडीबीटी पोर्टलवर बी-बियाण्यासह विविध कृषिविषयक योजनांसाठी अर्ज केले जातात. कृषी विभागाच्या २१६ योजनांची माहिती या पोर्टलवर उपलब्ध आहे.
- जिल्ह्यातील विविध कृषिविषयक योजनांसाठी जिल्ह्यातील २५ हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यात अनुदानावरील बियाणे तसेच अन्य कृषिविषयक योजनांचा समावेश आहे.
- अनुदानावरील बियाण्यांसाठी दीड हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यात पीक प्रात्यक्षिकधारक शेतकऱ्यांना शंभर टक्के तर इतर शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
- ज्या शेतकऱ्यांची अनुदानावरील बियाण्यासाठी निवड करण्यात आली आहे, त्या शेतकऱ्यांना एसएमएस पाठवला जातो.
...................
कोणत्या योजनेसाठी किती अर्ज
- एकात्मिक फलोत्पादन विकास योजना : ५६४३
- कृषी अभियांत्रिकी योजना : १२३४९
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : ३४२३
- एकात्मिक फलोत्पादन योजना : २३४३
....................
एसएमएस आला तरच मिळणार अनुदानावरील बियाणे
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावरील बियाणे प्राप्त करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना अर्ज या संकेतस्थळावर सबमिट झाल्याचा एसएमएस येतो.
- या ‘एसएमएस’वर अनुदानावर बी-बियाणे उपलब्ध होणार किंवा नाही, याची माहिती मिळते. त्यानंतर रजिस्ट्रेशन केलेल्या नंबरवरुन अनुदानावरील बियाणे महाबीजच्या अधिकृत विक्रेत्याकडून उपलब्ध करुन दिले जाते.
............
सर्वाधिक अर्ज यांत्रिकी शेतीसाठी
शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, या योजना राबवताना त्यात पारदर्शकता राहावी यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरु करण्यात आले. या पोर्टलवर विविध कृषिविषयक योजनांसाठी शेतकरी अर्ज करतात. यात सर्वाधिक अर्ज हे यांत्रिकी शेतीसाठी प्राप्त होतात. शेतकऱ्यांनी यांत्रिकी योजनेसाठी १२,३४९ अर्ज केले आहेत.
.............
ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या
कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जरी महाडीबीटी पोर्टल सुरु केले असले, तरी ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या गंभीर आहे. बरेचदा मोबाईलला नेटवर्क नसल्याने शेतकऱ्यांना एसएमएस मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागते. यावर काहीतरी उपाय करण्याची गरज आहे.
............
अर्ज केलेले शेतकरी म्हणतात...
आधी कृषिविषयक योजनांची माहिती आणि अर्ज करण्यासाठी कृषी विभागाच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत होत्या. यामुळे वेळ आणि श्रमसुध्दा वाया जात होते. मात्र, आता महाडीबीटी पोर्टलमुळे या सर्व गोष्टी करण्याची गरज नसून, महाडीेबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येत असून, ते अधिक सुलभ झाले आहे. त्यामुळे हे पाेर्टल शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
- पंढरी पाल, शेतकरी
.......
अनुदानावरील बियाणे असो की कृषिविषयक अवजारे अनुदानावर मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात अर्जावर कार्यवाही होऊन अवजारे उपलब्ध करुन दिली जातात. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार कृषी विभाग कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत नसून, शेतकऱ्यांना होणार त्रास कमी झाला आहे. शिवाय योजनेत पारदर्शकता आली आहे.
- देविदास बिसेन, शेतकरी.
..............