नवेगाव राष्ट्रीय उद्यानाला गतवैभव प्राप्त होईल काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:24 AM2021-01-09T04:24:15+5:302021-01-09T04:24:15+5:30
नवेगावबांध : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन संकुलाचा विकास रोजगार निर्मितीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केल्यास परिसरातील हजारो बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या ...
नवेगावबांध : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन संकुलाचा विकास रोजगार निर्मितीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केल्यास परिसरातील हजारो बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. सध्या हे पर्यटन संकुल वन्यजीव संरक्षण विभागाच्या ताब्यात असून,पर्यटन संकुलाच्या विकासासाठी अद्यापही या विभागातर्फे कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील हे उपेक्षित पर्यटन स्थळ कोसो दूर आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून हे पर्यटन संकुल स्थानिक वनव्यवस्थापन समितीला देण्यात यावे अशी मागणी अनेकदा समितीच्यावतीने करण्यात आली. परंतु वन विभाग,वन्य वन्यजीव संरक्षण विभागाचे अधिकारी, या परिसराचे लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षितपणामुळे समितीच्या या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गेल्या २२ वर्षांपासून राष्ट्रीय उद्यानाचे हे पर्यटन संकुल आपल्या गतवैभवावर अश्रू ढाळीत आहे. पर्यटन संकुलाच्या विकासाबाबत तत्कालीन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत गोंदिया, नागपूर, मुंबई या ठिकाणी शासन स्तरावर अनेक बैठका झाल्या. पर्यटन संकुल संयुक्त वन व्यवस्थापन समितीला हस्तांतरित करण्याचा निर्णयही निर्णयही अनेकदा झाला. पण त्यानंतर कुठलेच पाऊल उचलण्यात आले नाही.
....
रोजगारापासून वंचित
शासनाच्या पर्यटन धोरणानुसार या पर्यटन संकुलात विश्रामगृहे, बालोद्यान, उपाहारगृह, मनोहर उद्यान, संजय कुटी परिसर व विश्रामगृह, हॉलिडे होम गार्डन, पुनरुज्जीवनाच्या प्रतीक्षेत असलेला व अद्यापही लोकार्पण न झालेला राक गार्डन, सभागृह, मनोहर उद्यान, तंबू निवास, नौकानयन, चारशे पन्नास वर्षाची परंपरा असलेला ऐतिहासिक नवेगावबांध जलाशय, काही अंतरावर असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र संरक्षण प्रकल्प अशी अनेक स्थळे पर्यटकांना खुणावताहेत. ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी अनेक संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत. अशा सर्व गोष्टी अनुकुल असताना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास भरपूर वाव आहे. पण याकडे दुर्लक्ष होत आहे.
......
निधी उपलब्ध मात्र कामाला सुरुवात नाही
वनविभाग गोंदियाच्यावतीने चार वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट २०१६ ला येथे संयुक्त वन व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली आहे. समितीने १०० युवक-युवतींना पर्यटन संबंधित प्रशिक्षणही दिले आहे. हे प्रशिक्षित युवक-युवती आजही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. समितीकडे कोट्यावधी रुपयांचा निधी अखर्चित पडून आहे. पर्यटन संकुलाच्या विकासासाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पण काम सुरु झाले नाही.
......
कोट
शासनाने वन्यजीव संरक्षण विभागाकडून पर्यटन संकुल संयुक्त वनव्यवस्थापन समितीला त्वरित हस्तांतरित करावे. पर्यटन संकुलाचा विकास म्हणजे परिसरातील बेरोजगार हातांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आहे.
-अनिरुद्ध शहारे, अध्यक्ष संयुक्त वनव्यवस्थापन समिती नवेगावबांध.