मेंढ्याने दिला दगा, आता कोल्हा पावसाला बोलावणार का?
By admin | Published: June 28, 2017 01:22 AM2017-06-28T01:22:16+5:302017-06-28T01:22:16+5:30
यंदा पाऊस सरासरी पडणार असून शेतीसाठी समाधानकारक राहील, असा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तविला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : यंदा पाऊस सरासरी पडणार असून शेतीसाठी समाधानकारक राहील, असा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तविला होता. परंतु पावसाळ्याची सुरुवात तरी समाधानकारक झालेली दिसत नाही. मृग नक्षत्र कोरडाच आटोपला असून आर्द्रा नक्षत्राची सुरुवातही अपेक्षेप्रमाणे झालेली नसून गेले तीन दिवस कोरडेच गेलेले आहेत.
जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी सालेकसा तालुक्यात बहुतांश भाग आतापर्यंत कोरडाच असून प्रचंड उकाड्याला तोंड द्यावे लागत आहे. काही गावामध्ये पावसाचा शिडकाव झाल्यासारखी हजेरी लागली, त्यामुळे पृथ्वीवर गारवा निर्माण न होता उकाडा आणखी वाढलेला आहे. त्यामुळे धरणीला तृप्त करणारा झमझम पाऊस केव्हा पडणार, याची वाट शेतकरी वर्गासह सामान्य माणूसही बघत आहे.
८ जूनला मृग नक्षत्राला सुरुवात झाली असून शक सवंतप्रमाणे जेष्ठ महिन्याच्या उत्तरार्ध सुरु झाला. मृगाच्या पहिल्याच दिवशी पावसाने मेंढ्याला आपले वाहन बनविले व आरुढ झाला. परंतु मेंढ्याने पावसाची सवारी होऊ दिली नाही आणि दगा देऊन गेला. सामान्यत: मृग नक्षत्राच्या शेवटच्या दोनतीन दिवसात नक्कीच पावसाची हजेरी लागते. परंतु यंदा मृगाचा आरंभ आणि अंतही कोरडेच झाले. त्यामुळे शेतकरी वर्ग पेरणीसाठी मृगधारेची वाटच बघत राहीला.
मेंढा हा प्राणी सामान्यत: वाळवंट प्रदेशात अर्थात कमी पावसाच्या क्षेत्रात वावरणारा प्राणी असून त्याला पाण्याची फारसी गरज वाटत नाही. त्यामुळे यंदाच्या मृग नक्षत्राचे पावसाचे वाहन मेंढा होता. म्हणून मृग नक्षत्रात मेंढ्यापासून जास्त अपेक्षा नव्हती व अपेक्षेप्रमाणे पाऊसही पडला नाही. मृग नक्षत्र २३ जूनला संपला असून २४ जूनपासून आर्द्रा नक्षत्र लागला आहे. त्याचप्रमाणे आषाढ महिन्याला सुध्दा सुरुवात झाली आहे.
२४ जूनला अमावस्या होती. त्यादिवशी समुद्रात भरती ओहटीचे प्रमाण वाढते. अरबी समुद्रात याचा प्रभाव पहायला मिळाला असून मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु अपेक्षेनुसार अरबी समुद्रात जोर पकडलेला मान्सून मराठवाडा विदर्भात चौतरफा पोहोचलाच नाही.
पूर्वी विदर्भात तर मान्सून पूर्णपणे कमजोर झालेला दिसत आहे. आकाशात ढगाळ वातावरण बनत आहे. परंतु पावसाचे ढग निर्माण होत नाही. त्यामुळे पाऊस पडत नाही. आर्द्रा नक्षत्राला तीन दिवस लोटले तरी पाऊस पडला नाही. शेतकरी वर्ग पेरणी करण्यासाठी आतुरतेने पावसाची वाट बघत आहे. परंतु पाऊस लंपडावचा खेळ खेळताना दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वी काही गावात पावसाच्या झऱ्या आल्या. त्यामुळे काहींनी भाताच्या शेतीची पेरणी सुरु केली. परंतु जमिनीत ओलावा कमी असल्याने व्यवस्थित पेरणीसाठी जमिनीची नांगरणी करण्यात अवघड जात आहे.
आर्द्रा नक्षत्र पूर्णपणे पावसाचा जोर दाखवणारा नक्षत्र असून मोठी अपेक्षा आहे. या नक्षत्रात यंदा पावसाचे वाहन कोल्हा असून ५ जुलैनंतर पावसाळा असा करणार आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या काळात चार पाच दिवस खूप पाऊस पडेल, अशी अपेक्षा आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या उत्तरार्धात झमाझम पाऊस पडेल, असा अंदाज लावण्यात येत आहे. तरी शेतकरी वर्गाने घाई व चिंता करु नये. पावसाळा १५ दिवस उशीरा सुरु झाला तरी उत्तरार्थ मात्र समाधानकारक राहील, अशी अपेक्षा काही अनुभवी शेतकरी व्यक्त करीत आहेत.