आरक्षण बदलणार का रे भाऊ अध्यक्षपदाचे समीकरण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 05:00 AM2022-02-03T05:00:00+5:302022-02-03T05:00:12+5:30
जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची हा प्रश्न अद्यापही कायम आहे. दरम्यान अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे वाटप करून सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, चाबी आणि दोन अपक्ष सदस्य एकत्र येणार असून तसे झाल्यास २७ हा बहुमताचा आकडा गाठणे शक्य आहे. त्यामुळे याला घेऊन हालचालींना वेग आला असून हे समीकरण यशस्वी झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष होणार असल्याचे बोलल्या जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण यापूर्वी सर्वसाधारण निघाले होते; पण सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षण रद्द केल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाते की तेच आरक्षण कायम ठेवले जाते, याचा निर्णय ग्रामविकास विभागाच्या निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे. आरक्षणात बदल झाल्यास यासाठी इच्छुक असलेल्या सदस्यांचासुद्धा हिरमोड हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या आरक्षण बदलणार का रे भाऊ याची अशीच चर्चा सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या ५३ आणि पंचायत समितीच्या १०६ जागांचा निकाल १९ जानेवारीला जाहीर झाला. त्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांची नावांची यादी राजपत्रात नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी २४ जानेवारीला जाहीर केली. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक ही २४ फेब्रुवारीपूर्वी घ्यावी लागणार आहे, तर आठही पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक ही २४ फेब्रुवारीच्या आधीच होणार हेदेखील स्पष्ट आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत ही यापूर्वीच काढण्यात आली होती. तेव्हा हे पद सर्वसाधारण निघाले होते.
पण, आता ओबीसी आरक्षण रद्द झाले असल्याने यात काही बदल होतो की पूर्वीचे आरक्षण कायम राहील याबाबत जिल्हा निवडणूक विभागाने ग्रामविकास मंत्रालयाकडून मार्गदर्शन मागविले आहे.
त्यांचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतरच यावर निर्णय होणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता ग्रामविकास विभाग यावर नेमका काय निर्णय घेते यानंतरच जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा होणार आहे. आरक्षण बदलले तर या पदासाठी इच्छुक असणाऱ्यांचा हिरमोड होणार आहे. त्यामुळे याला घेऊन त्यांची धाकधूक वाढली आहे.
सत्ता स्थापनेचा होणार नवा प्रयोग
- जिल्हा परिषदेत भाजपने सर्वाधिक २६ जागा जिंकल्या तर काँग्रेस १३, राष्ट्रवादी काँग्रेस ८, चाबी ४ आणि २ अपक्ष सदस्य निवडून आले. एकूण ५३ सदस्यीय जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी २७ या मॅजिक फिगरची गरज आहे. पण भाजपकडे सर्वाधिक २६ जागा असल्या तरी भाजपला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेत नवीन प्रयोग होणार असल्याची चर्चा आहे.
तर उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा
- जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची हा प्रश्न अद्यापही कायम आहे. दरम्यान अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे वाटप करून सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, चाबी आणि दोन अपक्ष सदस्य एकत्र येणार असून तसे झाल्यास २७ हा बहुमताचा आकडा गाठणे शक्य आहे. त्यामुळे याला घेऊन हालचालींना वेग आला असून हे समीकरण यशस्वी झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष होणार असल्याचे बोलल्या जाते.
भाजपची वेट अँन्ड वॉचची भूमिका
- जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या विषयाला घेऊन जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी सध्या वेट ॲन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. १० फेब्रुवारीनंतरच यासंबंधीच्या प्रक्रियेला वेग येणार असून तोवर तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.