पक्षांनी शोधलेले सरपंच पदाचे उमेदवार परफेक्ट निघतील ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2022 09:20 PM2022-11-20T21:20:14+5:302022-11-20T21:20:50+5:30
कोणताही पक्ष असो राजकारणाची सुरुवात ग्रामपंचायतीपासूनच होत असल्याने राजकीय पक्ष आणि नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. म्हणूनच त्यांनाही आता परफेक्ट उमेदवाराची गरज असून ते शोध घेत आहेत. तर दुसरीकडे इच्छुकांकडूनही तयारी सुरू झाली असून भेटीगाठी व जनसंपर्कावर भर दिला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येत्या १८ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंचाची निवड केली जाणार असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापासूनच वातावरण तापले आहे. अशात परफेक्ट उमेदवाराचा पक्षांकडून शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे इच्छुकही आपणच बेस्ट हे दाखवून देण्यासाठी तयारीला लागले आहेत. यामध्ये कार्यकर्त्यांसाठी पार्ट्यांचे आयोजनही सुरू झाले आहे. मात्र पक्षांकडून निवडले जाणारे उमेदवार खरोखरच परफेक्ट निघणार काय? याबाबतही नागरिकांत चर्चा सुरू आहेत.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींचाही समावेश होत असून येत्या १८ डिसेंबर ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका कुठल्याची राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाही; परंतु, राजकीय पक्षांकडून ग्रामपंचायत काबीज करण्यासाठी पॅनल तयार करून निवडणूक लढविली जाते. त्यात १५व्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायतींना विशेष महत्त्व आले आहे. शिवाय सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने राजकीय पक्षांकडून जास्त रस घेतला जात आहे.
निवडणुकीला जरी वेळ असला तरी आतापासूनच जिल्ह्यात गावागावांत राजकीय वातावरण तापू लागले आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतींना विशेष महत्त्व आल्याने तरुण वर्गसुद्धा आता सक्रिय झाला असून निवडणुकीला चांगलीच रंगत येत आहे. शिवाय, कोणताही पक्ष असो राजकारणाची सुरुवात ग्रामपंचायतीपासूनच होत असल्याने राजकीय पक्ष आणि नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. म्हणूनच त्यांनाही आता परफेक्ट उमेदवाराची गरज असून ते शोध घेत आहेत. तर दुसरीकडे इच्छुकांकडूनही तयारी सुरू झाली असून भेटीगाठी व जनसंपर्कावर भर दिला जात आहे.
काहीही करून जास्तीत जास्त ग्रामपंचायत काबिज करावयाच्या असल्याने नेते मंडळींकडूनही विविध फंडे आजमाविले जात आहेत. यासाठी समविचार पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबत जुळवून घेत निवडणुका लढण्याचे, बैठका घेऊन योग्य नियोजन करण्याचे फंडे अवलंबिले जात आहेत.
कागदपत्रांची जुळवाजुळव
- निवडणूक लढवित असताना त्यासाठी आरक्षण किंवा खुले गट अशात विविध कागदपत्रांची गरज असते. यामधील एखादेही कागद सुटू नये, यासाठी इच्छुकांकडून आतापासूनच तयारी सुरू आहे. यासाठी ते संबंधित पक्ष तसेच अनुभवी व्यक्तींकडून सल्ला घेत कागपदत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी भिडून आहेत.
कार्यकर्ता व मतदारांची आवभगत
- निवडणुकीत कार्यकर्ता व मतदार या दोघांनाच विशेष महत्त्व असते. यामुळेच इच्छुकांकडून आतापासून आपल्या कार्यकर्ता व मतदारांचे आवभगत सुरू झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, यासाठी पार्ट्यांना सुरुवात झाली असून नॉनव्हेजसोबत शौकिनांसाठी दारूचीही व्यवस्था केली जात आहे. कार्यकर्ता तसेच मतदार नाराज झाले नाही पाहिजे, याची खबरदारी घेतली जात आहे.