शशीकरण पहाडीजवळ वनतलाव होणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 10:40 PM2018-05-17T22:40:38+5:302018-05-17T22:40:38+5:30
तालुक्यातील दल्ली परिसरात वनतलावाची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे; मात्र अद्यापही ती मार्गी लागली नाही. त्यामुळे शशीकरण पहाडीजवळ वनतलाव केव्हा होणार असा सवाल गावकऱ्यांकडून केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : तालुक्यातील दल्ली परिसरात वनतलावाची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे; मात्र अद्यापही ती मार्गी लागली नाही. त्यामुळे शशीकरण पहाडीजवळ वनतलाव केव्हा होणार असा सवाल गावकऱ्यांकडून केला जात आहे.
सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या रेंगेपार सहवनक्षेत्रातील कपांर्टमेंट नंबर ५५२ मधील शशीकरण पहाडीच्या पायथ्याशी असलेल्या वनात वन तलावाची गरज आहे. ५५२ कंपार्टमेंटच्या २ कि.मी. परिसरात कुठेही तलाव नाही. रेंगेपार तलाव, दल्लीचा फुटका बोडी या दोन पाण्याच्या साधनांवर शशीकरण पहाडी व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्य लागून आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. अनेकदा पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात. त्यामुळे शशीकरण पहाडीजवळ वन तलावाचे काम केल्यास वन्यप्राण्यांची तहान भागविण्यास मोठी मदत होईल. शशीकरण पहाडी परिसरात घनदाट जंगल आजही पहावयास मिळते. या जंगलात अस्वल, बिबट, हरिण, सांबर, निलगाय, वाघ, रानकुत्री, तडस, रानमांजर आदी प्राणी प्रामुख्याने आढळतात. प्राण्यांना पिण्याचे पाण्याची सोय नसल्यामुळे बरेचदा या जंगलातील वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात. यात प्राण्यांना जीव गमवावा लागतो. शंभर वर्षापूर्वी इंग्रजाच्या काळात ५५२ कंपार्टमेंटमध्ये तलाव बांधल्याचे पुरावे आजही आहे. त्या तलावाची पाळ फुटली असल्यामुळे पावसाळ्यात या तलावातील पाणी सरळ जंगलात वाहून जाते. त्यामुळे या तलावाची दुरूस्ती केल्यास तलावात पाणी साठवून ठेवण्यास मदत होईल. तसेच वन्य प्राण्यांना सुध्दा पाण्याची सोय होईल. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन वन तलावाची दुरूस्ती करण्याची गरज आहे.