विदर्भ एक्स्प्रेस कधी धावणार वेळेवर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:09 PM2017-09-14T22:09:43+5:302017-09-14T22:10:02+5:30
मागील आठवडाभरापासून विदर्भ एक्स्प्रेस तब्बल पाच ते सहा तास विलंबाने धावत असल्याने नागपूर ते गोंदिया व गोंदिया ते नागपूर असा प्रवास करणाºया प्रवाशांची मोठी फजिती झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील आठवडाभरापासून विदर्भ एक्स्प्रेस तब्बल पाच ते सहा तास विलंबाने धावत असल्याने नागपूर ते गोंदिया व गोंदिया ते नागपूर असा प्रवास करणाºया प्रवाशांची मोठी फजिती झाली आहे. या गाडीने नियमित प्रवास करणारे आता विदर्भ एक्स्प्रेस कधी वेळेवर धावणार, असा सवाल रेल्वे प्रशासनाला करीत आहेत.
डाऊन मार्गावर नागपूर ते गोंदियापर्यंत नागपूर, कामठी, भंडारा, तुमसर व तिरोडा तर अप मार्गावर याच स्थानकांवर विदर्भ एक्स्प्रेसचे थांबे आहेत. गोंदियाच्या शासकीय, खासगी कार्यालयांतील अनेक कर्मचारी अपडाऊन करतात. त्यामुळे त्यांना ही गाडी म्हणजे कार्यालयात वेळेवर पोहचण्यासाठी उत्तम माध्यम आहे. परंतु आठवडाभरापासून ही गाडी पाच ते सहा तास विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना फटका बसला आहे. डाऊन मार्गावर धावणारी विदर्भ एक्स्प्रेस (१२१०५) बुधवारी तब्बल सहा तास विलंबाने धावत होती. तिची गोंदियाला पोहोचण्याची नियमित वेळ ११ वाजताची आहे, मात्र विलंबाने धावत असल्याने ती सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान पोहोचली. यामुळे विदर्भ एक्स्प्रेसचे वेळापत्रकच ढासळले आहे. त्याचा फटका या गाडीने प्रवास करणाºया अनेक प्रवाशांना बसत आहे. अप मार्गावर विदर्भ एक्सप्रेसची (१२१०६) गोंदिया स्थानकातून नियमित सुटण्याची वेळ दुपारी २.५५ वाजताची आहे. परंतु डाऊन मार्गावर धावणारी विदर्भ एक्स्प्रेस जर पाच ते सहा तास विलंबाने धावत असली तर अप मार्गावर ती गाडी गोंदिया स्थानकातून दुपारी २.५५ ऐवजी सायंकाळी ६ ते ७ वाजता सुटत आहे.
गोंदिया स्थानक जंक्शन असल्यामुळे विदर्भ एक्स्प्रेसने नागपूर-मुंबईच्या दिशेने जाणारे प्रवाशी गोंदिया स्थानकावर दुपारी दोन ते अडीच वाजताच पोहोचतात. मात्र गाडीच्या विलंबामुळे त्यांना सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
आम्ही विदर्भ एक्सप्रेसमध्ये तिरोडा स्थानकातून बसून गोंदियाला येतो. मात्र ही गाडी आता विलंबाने येत असल्याने मिळेल त्या चारचाकी वाहनाने गोंदियाला येवून कार्यालयात जावे लागते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे.
-पवन वासनिक
विदर्भ एक्स्प्रेसचे नियमित प्रवासी असून विलंबाचा फटका बसल्याने कार्यालयीन वेळेत पोहोचण्यासाठी धावपळ होते. शिवाय मासिक पासधारकांना रेल्वे कर्मचाºयांकडून त्रास दिला जातो. पास असतानाही अनेकदा दंड ठोकला जातो. हा प्रकार बंद करण्यात यावा.
-नितीन कोहाट
नागपूरवरून विदर्भ एक्स्प्रेसने गोंदियाला येवून आपली ड्युटी यशस्वीरित्या करतो. मात्र आठवडाभरापासून विदर्भ एक्स्प्रेस तब्बल पाच ते सहा तास विलंबाने धावत असल्याने अनेकदा एसटीच्या बसने गोंदियाला पोहोचावे लागले. ऐनवेळी रेल्वे स्थानकातून बस स्थानकावर पोहोचण्यासाठी मोठीच कसरत करावी लागली.
-सतीश झलके
रेल्वे प्रशासनाने विदर्भ एक्स्प्रेस अप व डाऊन दोन्ही मार्गावर नियमित व नियोजित वेळेत चालविण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. जर डाऊन मार्गावर इंटरसिटी व विदर्भ एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांच्या मधातील वेळेत एखादी तिसरी गाडी असती तर एवढी गैरसोय झाली नसती. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने उपायोजना करणे गरजेचे आहे.
- मोहन जरूळकर
कामानिमित्त गोंदियावरून तुमसरला नियमित जावे लागते. मात्र अप मार्गावर अनेकदा विदर्भ दुपारऐवजी सायंकाळी सोडण्यात येत असल्याने कार्यालयात वेळेत पोहचणे अशक्य होत आहे.
-मंगेश रंगारी