पावसाच्या आगमनाने जिल्हा ‘ठंडा ठंडा कूल कूल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2022 08:38 PM2022-06-19T20:38:00+5:302022-06-19T20:38:36+5:30
हवामान खात्याने यंदा लवकर पाऊस येणार असा अंदाज वर्तविला होता. मात्र, निसर्गाने त्यांचा अंदाज फोल ठरविला व ७ जूनपासून मृग लागूनही पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नव्हती. परिणामी, उन्हाळा काही संपला नव्हता व रखरखत्या उन्हामुळे जिल्हावासी त्रासून गेले होते, तर दुसरीकडे बळीराजाची चिंता वाढत होती व पावसाअभावी शेतीची कामे ठप्प पडून होती. अशात सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागून होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जून महिना अर्धा लोटूनही जिल्ह्यात पावसाची हजेरी लागली नसल्याने चिंतेत असलेल्या सर्वांनाच शनिवारी (दि.१८) रात्री पावसाने हजेरी लावून सुखद धक्का दिला. जिल्ह्यात पावसाचे आगमन झाल्याने एकीकडे जिल्ह्याचे तापमान घसरले असून, जिल्हा ‘ठंडा ठंडा -कूल कूल’ झाला असतानाच दुसरीकडे शेतकरी कामाला लागला असून, शेतीच्या कामांनी जोर धरला आहे.
हवामान खात्याने यंदा लवकर पाऊस येणार असा अंदाज वर्तविला होता. मात्र, निसर्गाने त्यांचा अंदाज फोल ठरविला व ७ जूनपासून मृग लागूनही पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नव्हती. परिणामी, उन्हाळा काही संपला नव्हता व रखरखत्या उन्हामुळे जिल्हावासी त्रासून गेले होते, तर दुसरीकडे बळीराजाची चिंता वाढत होती व पावसाअभावी शेतीची कामे ठप्प पडून होती. अशात सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागून होत्या. मात्र, उशिरा का होईना पावसाने जिल्ह्यात शनिवारी (दि.१८) रात्री हजेरी लावली व त्यामुळे तापमानात घट झाली असून, उकाड्यापासून सुटका मिळाली असतानाच शेतकरीसुद्धा सुखावला असून, तो कंबर कसून काळ्या मातीत उतरला आहे.
जिल्ह्यात ४६.९ मिमी पावसाची नोंद
- जिल्ह्यात शनिवारी खऱ्या अर्थाने पावसाळ्याला सुरुवात झाली असून, जून महिन्यातील १९ तारखेपर्यंत ४६.९ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस ७६.४ मिमी देवरी तालुक्यात नोंदण्यात आला असून, सर्वांत कमी ४३.३ मिमी पाऊस गोंदिया तालुक्यात नोंदण्यात आला आहे.
पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग
- जिल्ह्यात आतापर्यंत पाऊस बरसला नसल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र, आता पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतीची कामे पुन्हा एकदा जोमात सुरू झाली आहेत. शेतकऱ्यांची आता पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. पावसाने साथ दिली, तर यंदा नक्कीच चांगले पीक घेऊन शेतकरी फायदा घेतील.