विमा काढूनही भरपाई मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:34 AM2017-10-29T00:34:24+5:302017-10-29T00:34:38+5:30
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळावी. यासाठी शेतकºयांनी पिक विमा काढला. त्यातून किमान केलेला लागवड खर्च तरी भरुन निघेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळावी. यासाठी शेतकºयांनी पिक विमा काढला. त्यातून किमान केलेला लागवड खर्च तरी भरुन निघेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती. मात्र अवकाळी पावसामुळे धान पिकांचे नुकसान होवूनही शेतकºयांना नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
आठ दहा दिवसांपूर्वी अर्जुनीमोरगाव तालुक्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन धान कापनीला आले असता अवकाळी पाऊस आणि वादळामुळे संपूर्ण धान पिक झोपल्या गेले. अनेक शेतकºयांच्या शेतातील धानाची लोंबे रात्रभर पाण्यात राहिल्याने धान अक्षरक्ष: सडले. त्यामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. येरंडी येथील यशवंत कुंभरे यांच्या शेतातील संपूर्ण धानाचे नुकसान झाले. त्यांनी पिक विमा काढला असून त्यातून नुकसान भरपाई मिळण्याची आशा होती. परंतु आता विमा कंपन्यानी हातवर केल्याने त्यांच्यासमोर बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. ही केवळ कुंभरे यांची स्थिती नसून तालुक्यातील अनेक शेतकºयांची स्थिती आहे. या भागातील अनेक शेतकºयांनी आदिवासी विविध कार्यकारी सेवा संस्था बाराभाटी अंतर्गत पिक विमा काढला. परंतु पिक विमा प्रतिनिधी या भागात भटकत नसल्याचे चित्र आहे. यशवंत कुंभरे यांच्या शेताची कृषी विभागाने पाहणी केली. तलाठी यांनी नुकसानीचा पंचनामा केला. मात्र नुकसान भरपाई मिळणार की नाही. याची माहिती देण्यास टाळटाळ करीत आहे.
कुंभरे यांच्या शेताची पाहणी केली वादळी पावसामुळे त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा पंचनामा करुन माहिती वरिष्ठांकडे पाठविली आहे.
- बी.एन. नखाते,
कृषी सहायक, नवेगावबांध