१५ दिवसातच खड्डे ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:11 AM2018-02-21T01:11:58+5:302018-02-21T01:12:37+5:30

सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक-अर्जुनी या १४ किमी. लांबीच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरुन वाहने चालवावी लागतात.

Within 15 days the pits were 'like' | १५ दिवसातच खड्डे ‘जैसे थे’

१५ दिवसातच खड्डे ‘जैसे थे’

Next
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : शेंडा ते सडक-अर्जुनी मार्गाचे नव्याने डांबरीकरण करा

लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा (कोयलारी) : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक-अर्जुनी या १४ किमी. लांबीच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरुन वाहने चालवावी लागतात. या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, यासाठी अनेकदा वृत्तपत्रांतून बातम्या झळकल्या. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या वृत्तांकडे लक्ष न देता कंत्राटदार व स्वहिताकडे लक्ष देवून अधूनमधून खड्डे बुजविण्याचे काम केले. परिणामी १५ दिवसांतच खड्ड्यांची ‘जैसे थे’ परिस्थिती झाली आहे.
सडक-अर्जुनी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने लोकांना कार्यालयीन कामासाठी येणे-जाणे करावे लागते. अशातच दिवसेंदिवस वाहतुकीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. परिणामी रस्त्याची दुर्दशा होवून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याच मार्गावर येणाऱ्या शेंडा ते उशिखेडा या ५ किमी. रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट आहे. या रस्त्यावरुन वाहन चालकांना आपली बाजू सोडून कधीकधी उजव्या बाजूने वाहन चालवावे लागते. अशावेळी अपघात घडून मृत्यूला आमंत्रण देण्याची परिस्थिती येवू शकते.
या मार्गावर प्रत्येक १-२ किमी.च्या अंतरावर जीवघेणे वळण आहेत. त्यामुळे समोरुन येणारे वाहन एकमेकांना दिसत नाही. अशातच अनेक अपघात घडले आहेत. राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा करून १५ डिसेंबर २०१७ पर्यंत खड्डे भरण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले होते. मात्र अडेलतट्टू अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी केली नसल्याचे दिसून येते.
राष्टÑीय महामार्ग क्र.६ पासून पुतळी, कोयलारी, शेंडा, सालईटोला हा मार्ग तयार असताना या मार्गावर नव्याने डांबरीकरणाचे काम प्रगती पथावर आहे. परंतु शेंडा ते सडक अर्जुनी या रहदारीच्या मार्गाकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावरुन सा.बां. विभागाच्या अधिकाºयांच्या कार्यप्रणालीवर शंका निर्माण होते. हा परिसर आदिवासीबहुल व नक्षल क्षेत्रात मोडतो. त्यामुळे शासन व प्रशासन या क्षेत्राकडे नेहमीच दुर्लक्ष करतात, असे बोलले जाते. त्याचप्रमाणे काम न करताच काम सुरु असल्याचे सांगून वरिष्ठ व जनतेची दिशाभूल केली जाते.
याचे ताजे उदाहरण म्हणजे खोल ढोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रपट्यावर याच वर्षी नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु पोच मार्गाच्या कामाला त्यावेळी सुरुवात झाली नव्हती व सद्यस्थितीत सुद्धा झाली नाही. तरी सा.बां. विभागाच्या एका अधिकाऱ्याने पोच मार्गाचे काम सुरु असल्याचे वर्तमान पत्रातून प्रकाशित करुन स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेतली होती. यावरुन या विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मानसिकता लक्षात येते. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्ता पूर्णत: उखडला आहे. त्यामुळे नव्याने डांबरीकरण होणे गरजेचे आहे. जेणेकरुन या मार्गावरुन रहदारीला त्रास होणार नाही. यासाठी सा.बां. बांधकाम विभागाने जातीने लक्ष पुरवून नव्याने डांबरीकरण करावे, अशी मागणी जनतेकडून करण्यात आली आहे.
दरवर्षी ठिगळ लावण्याचा उपक्रम
मागील तीन वर्षांपूर्वी शेंडा ते सडक-अर्जुनी या १४ किमी. अंतराच्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण होणार होते. त्यासाठी ४० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. एवढेच नाही तर या रस्त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनही उरकले होते. मात्र तीन वर्षांचा काळ लोटूनही डांबरीकरणास सुरुवात झाली नाही. कंत्राटदार व स्वत:चे हित जोपासून दरवर्षी ठिगळ लावण्याचा उपक्रम सार्वजनिक बांधकाम विभाग राबवित असल्याचे दिसून येते.

Web Title: Within 15 days the pits were 'like'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.